Breaking News

अलिबागमधील भूमिगत विद्युतवाहिन्या प्रकल्प रखडला!

अलिबाग शहर तसेच शेजारील  चेंढरे व वरसोली ग्रामपंचायतीच्या काही भागात भूमिगत विद्युत प्रणाली प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य  देण्यात येणार्‍या या प्रकल्पासाठी 89 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षीत आहे.  या प्रकल्पाला मंजुरी मिळून सहा वर्षे झाली तरी देखील हा प्रकल्प कार्यान्वीत झालेला नाही. सध्या या प्रकल्पाचे काम  सुरू आहे मात्र कामाला वेग नाही. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.  नागरिकांनी देखील  तेवढेच सहकार्य करणे आवश्यक आहे.

चक्रीवादळ व अन्य प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वरून जाणार्‍या वीज वाहिन्या (ओव्हरहेड वायर) तुटून, पोल कोसळून अनेक वित्तीय  नुकसान व जीवनहानी होत असते. शिवाय विद्युत पुरवठा खंडित होऊन जनजीवनावर परिणामही होत असतो. हे टाळण्यासाठी जागतिक बँक, केंद्र व राज्य शासनाच्या अर्थसाहाय्याने राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोकेनिवारण प्रकल्प अंतर्गत समुद्रकिनार्‍यावरील शहरात भूमिगत विद्युत प्रणाली प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी अलिबाग शहराची निवड करण्यात आली. भूमिगत विद्युत प्रणाली तयार करुन सशक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. आपत्ती धोके निवारण कार्यक्रमातून राबवण्यात येणारा हा राज्यातील दुसरा प्रकल्प ठरणार आहे. तीन  वर्षापूर्वी याचे काम सुरु करण्यात आले. काही कारणांमुळे हे काम थांबविण्यात आले. निसर्ग चक्रीवादळात संपूर्ण जिल्ह्याची वीज यंत्रणा पुर्णपणे कोलमडली. जिल्ह्याचे मुख्यालय  असलेल्या अलिबाग शहराचा देखील वीजपुरवठा दोन दिवस खंडीत होता. त्यामुळे अलिबाग शहरात भूमिगत विद्युत प्रणाली असायला हवी अशी मागणी व्हायला लागली.  निसर्ग वादळानंतर पुन्हा भूमिगत विद्युत प्रणालीच्या कामाला  सुरुवात करण्यात आले.

या प्रकल्पात एकूण 27 कि.मी. लांबीची उच्चदाब वाहिनी व 45 कि.मी. लांबीची लघुदाब वाहिनी भूमिगत टाकली जाणार आहे. 7.9 चौ.कि.मी.परिसरात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यात एकूण 118 रोहित्र, 78 आरएमयु, यांचाही समावेश आहे. भूमिगत केबल टाकण्यासाठी ट्रॅचिंग व ट्रॅच लेस जमिनीत आडवे ड्रिलिंग करणे या पद्धतीचा वापर होईल. केबल साठी जमिनीखाली 0.8 ते 1.2 मि. खोलखड्डा असेल तर रोहित्र जमिनीपासून 1.5 मिटरवर असतील. सद्या अलिबाग परिसरातील विद्यूत वाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरु झाले आहे. ही सर्व कामे सप्टेंबर 22 अखेर पर्यंत पुर्ण होणे अपेक्षीत आहे.  याप्रकल्पाचे 50 टक्के पूर्ण झाले आहे. परतु  या कामाची  सध्याची गती पाहता हे काम येत्या सप्टेंबर महिन्यात पूर्ण होईल असे वाटत नाही.

चक्रीवादळ व अन्य प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी उपरी तारमार्ग (ओव्हरहेड वायर) तुटून,पोल कोसळून अनेक प्रकारे नुकसान व जीवित हानी होत असते. शिवाय विद्युत पुरवठा खंडित होऊन जनजीवनावर परिणामही होत असतो. हे टाळण्यासाठी भुमिगत विद्युत प्रणाली तयार करुन सशक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.  या प्रकल्पामुळे शहरातील विद्युत वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण तर होईलच शिवाय ओव्हरहेड वायर काढण्यात आल्याने शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अलिबाग शहर, चेंढरे ग्रामपंचायत व वरसोली ग्रामपंचायतीचा काही भाग येथे हे भूमिगत केबल केली जाणार आहे. तसेच अलिबाग शहरातील 22/22 के.व्ही.अलिबाग स्विचिंग स्टेशनचेही नुतनीकरण होणार आहे. अलिबागसाठी आवश्यक असलेला हा प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक आहे.

कारणे शोधणे आवश्यक

काही कारणांमुळे केबल टाकण्याच्या कामात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. नागरीकांचे सहकार्य मिळत नसल्याचे वीजमंडळाकडून सांगण्यात आले. खरं तर हा प्रकल्प जागतिक बँकेच्या साहाय्यातून होत आहे. त्यात अलिबाग नगर परिषदेचा किंवा शेजारच्या ग्रा.पं.चा एक पैसा देखील खर्च होणार नाही. भविष्यातील अलिबाग शहराचा विचार करता या शहारत भूमिगत विद्युतवाहिन्या असणे गरजेचे आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी राजकीच नेतृत्वाने पुढाकार घेतला पाहिजे. तसेच या प्रकल्पाची गरज ओळखून अलिबागकरांनी देखील सहकार्य करायला हवे. हा प्रकल्प लवकर कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. हा प्रकल्प का रखडतोय त्याची करणे शोधून हे अडथळे दूर केले पाहिजेत.

-प्रकाश सोनवडेकर, खबरबात

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply