Breaking News

‘नाइट लाइफ’मुळे पोलिसांवर ताण

आशिष शेलार यांनी व्यक्त केली भीती; 24 तास हॉटेल्स सुरू ठेवण्याच्या निर्णयाला भाजपचा विरोध

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील हॉटेल, पब्स, मॉल्स आणि थिएटर सुरू ठेवण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाविरोधात भाजपने बंडाचे निशाण फडकावले आहे. रात्रीच्या वेळी बार, लेडीज बार आणि डिस्को सुरू राहिले तर पोलिसांवरील ताण आणखीन वाढेल, अशी भीती भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली. ते शनिवारी (दि. 18) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी त्यांनी म्हटले की, अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स व्यासपीठांमुळे राज्यातील व्यापार्‍यांवर अगोदरच आक्रमण झाले आहे. सरकारच्या निर्णयाने लहानसहान व्यापार्‍यांना फायदा होत असेल तर या निर्णयाला आमचा पाठिंबाच आहे, मात्र निवासी भागांमधील हॉटेल्स 24 तास सुरू राहणार असतील, तर भाजपचा त्याला विरोध आहे. कारण सर्वसामान्य, नोकरदार लोकांना झोप आवश्यक आहे. निवासी भागातील लोकांना या निर्णयाचा त्रास होऊ नये, अशी भाजपची भूमिका आहे. दुकाने आणि मॉल्स 24 तास सुरू राहिल्याने पोलिसांवरील ताण वाढेल. पोलिसांना संपूर्ण रात्र काम करावे लागेल, तसेच वाहतूक पोलीस आणि प्रशासनावरील ताणही वाढेल. त्यामुळे संपूर्ण चौकटच विस्कळीत होईल, असे आशिष शेलार यांनी म्हटले. 26 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून मुंबईतील रेस्टॉरंट, मॉल्स, मल्टिप्लेक्स प्रायोगिक तत्त्वावर सुरू ठेवण्यात येतील. नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा अनिवासी क्षेत्रातून याची सुरुवात होईल. या भागातील मॉल्स, दुकाने, हॉटेल्स 24 तास खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु या निर्णयामुळे सामान्य मुंबईकरांची शांतता भंग करणार असाल; तर त्याला आम्ही कडाडून विरोध करू, अशा शब्दांत आमदार आशिष शेलार यांनी भाजपचा विरोध मांडला.

Check Also

परेश ठाकूर यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

पनवेलसह रायगडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची (एमबीए) ८४वी चतुर्वार्षिक …

Leave a Reply