खोपोली : प्रतिनिधी
सध्या खोपोली शहरातील अनेक भागात त्याचप्रमाणे आदिवासी वस्तीत पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. नगर परिषद प्रशासन खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करीत असला तरी, भविष्यात नगर परिषदेने पाणीपुरवठा करण्याबाबत नियोजन करावे, अशी मागणी पुढे येत आहे. विशेषत: नगरपालिका हद्दीतील काही आदिवासी वाड्या टेकडीवर असल्याने, अनेकदा त्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, याबाबतही आदिवासी समाजाने नगर परिषद प्रशासनाला वारंवार विनंती केल्याचे सांगण्यात येत आहे.
खोपोली शहराच्या अनेक भागात पाण्याचा साठा असो वा नसो मोठ्या प्रमाणात इमारतीचे जाळे पसरत आहे. शहरात दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे. अनेक इमारतीच्या बोरवेलचे पाणी आटल्याने, या इमारतीतील रहिवासी नगर परिषदेच्या पाण्यावर अवलंबून आहेत. शहरातील विना नगर, कातरंग, मोगलवाडी या भागात मोठ्या प्रमाणात इमारतीचे जाळे आहे.
शहरातील मिळ ठाकुरवाडीमधील तीन वाड्या व कातरंग धनगरवाडा अशा चार वाड्या उंचावर आहेत. त्या ठिकाणी पाणीपुरवठा होत नसल्याचे येथील नागरिकांची ओरड आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून ठेकेदारामार्फत टँकरद्वारा पाणीपुरवठा सुरू आहे, मात्र या ठिकाणी पाणी योजना राबविणे ही काळाची गरज आहे.
नगर परिषदेचे पाणीपुरवठा अधिकारी विनय शिपाई यांनी सांगितले की, खोपोली शहरातील पाणीपुरवठा सुरळीत आहे, मात्र काही ठिकाणी खाजगी बोअरवेलचे पाण्याचे स्त्रोत उन्हाळ्यात गायब झाल्याने पाण्याची ओरड सुरू आहे. त्या भागात नळ जोडण्या कमी प्रमाण आहेत. त्या वाढविणे गरजेचे आहे. उंचावरील आदिवासी भागात पाणीटंचाई भासू नये, यासाठी मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्या आदेशाने टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, खोपोली नगर परिषद हद्दीतील मिल ठाकुरवाडी परिसरात आणखी तीन वाड्या आहेत, तर धनगरवाडा हा भाग उंचावर आहे. तेथे अद्यापही टँकरने पाणीपुरवठा होत आहे. नगर परिषदेने तेथे तातडीने पाणी योजना राबवावी, अशी मागणी माजी नगरसेवक राजाभाऊ ढुमने यांनी केली आहे.