सोमवारी कामगार आयुक्त कार्यालयात संयुक्त बैठक
पनवेल : प्रतिनिधी
आजिवली गावस्थित असलेल्या आयरन माउंटन कंपनीने कामगारांना कामावरून कमी केल्याने त्या विरोधात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रास्ता रोको आंदोलन करत कंपनी व्यवस्थापनाला इशारा दिला. त्यामुळे कामगारांच्या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी कामगार आयुक्त यांच्यासमवेत व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासनाची बैठक होणार असून कामगारांना कामावर पूर्ववत घ्या नाही तर या पेक्षा मोठे आंदोलन करण्याचा गर्भित इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भाजपचे तालुका सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष पाटील, आप्पा भागीत, राम गोजे, भाजपचे गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, युवा नेते अनिल पाटील, तानाजी पाटील, शिवाजी माळी, प्रवीण ठाकूर, अनंतबुवा पाटील, रवी शेळके, संदेश गोजे, यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
आयरन माऊंटन या कंपनीमध्ये काम करणाऱ्या स्थानिक कामगारांना अचानकपणे व्यवस्थपणाने कामावरून कमी करत बेरोजगार केले आहे. त्यामुळे या कामगारांना पूर्ववत कामावर न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. कंपनी व्यवस्थापनाने या संदर्भात दुर्लक्ष केल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत शेकडो कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि कामगारांनी जुना मुंबई पुणे महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. आणि जो पर्यंत कामगारांचा प्रश्न निकाली लागत नाही तो पर्यंत हटणार नाही असा इशारा यावेळी देतानाच घोषणांनी आसमंत दणाणला होता. यावेळी वाहतुकीची मोठी रांग या महामार्गावर लागली होती. आंदोलनाचे स्वरूप तीव्र होण्याचे चित्र दिसताच पोलीस प्रशासनाने यामध्ये मध्यस्थी केली. त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना आंदोलन मागे घेण्यास सांगितले. मात्र जो पर्यंत कामगारांना कामावर पूर्ववत करीत नाही तो पर्यंत जागेवरून हलणार नसल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केले. अखेर पोलिसांनी या संदर्भात व्यवस्थापनासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्या अनुषंगाने सोमवारी खांदा कॉलनी येथे असलेल्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगार आयुक्त, व्यवस्थापन अधिकारी व पोलीस प्रशासन यांची हि बैठक घेण्याचे मान्य झाले आहे, आणि त्यानुसार आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. मात्र कामगारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला आहे.