Breaking News

सागर म्हात्रे ठरला मराठी इंडियन आयडॉल

पनवेल, उरणसह रायगडचे नाव उंचावले

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर, बातमीदार
पनवेलजवळील करंजाडे येथे राहणारा आणि मूळचा उरण तालुक्यातील कोप्रोली येथील गायक सागर विश्वास म्हात्रे याने सोनी मराठी टीव्ही वाहिनीवरील मराठी इंडियन आयडॉल या कार्यक्रमाचा पहिला विजेता होण्याचा बहुमान पटकाविला. मराठी इंडियन आयडॉलचा किताब पटकाविल्याने सागरवर पनवेल, उरणसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सागरला बुधवारी विजयी घोषित केल्यानंतर गुरुवारी (दि. 21) सकाळी कोप्रोली येथे मिरवणुकीने त्याचे जंगी स्वागत करण्यात आले.
पेशाने ऑटोमोबाईल इंजिनिअर असलेल्या सागर म्हात्रे याने मराठी इंडियन आयडॉल या गाण्यांच्या कार्यक्रमात सहभाग घेत सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्या मनावर अधिराज्य गाजवून संपूर्ण अवघ्या महाराष्ट्राला आपल्या गायनाने मंत्रमुग्ध केले. सागरच्या विजयानंतर त्याचे वडील व पनवेल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विश्वास म्हात्रे यांना आनंदाश्रू अनावर झाले. माझे स्वप्न खर्‍या अर्थाने साकार झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अत्यंत कष्टातून पुढे आलेल्या या सागरचे संपूर्ण राज्यभर कौतुक होत आहे.
इंडियन आयडॉल सागर म्हात्रे याने उरणमध्ये आल्यावर जासई येथे जाऊन लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हार घालून अभिवादन केले. त्याचप्रमाणे चिरनेर येथील महागणपतीचे दर्शन घेतले. गुरुवारी सकाळी कोप्रोली येथून बॅण्ड व लेझिमच्या तालावर सागरची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी सागरचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले. खोपटे, पाणदिवे, पिरकोन, पाले, गोवठणे, आवरे, सारडे, वशेणी, पुनाडे, केळवणे, चिरनेर, कळंबूसरे, मोठी जुई असे फिरून कोप्रोली येथे रॅलीची सांगता झाली. मला घडविणार्‍या माझ्या आई-वडिलांसह मार्गदर्शन करणार्‍या मार्गदर्शकांचा मी ऋणी आहे, अशी विनम्र भावना सागर म्हात्रे याने व्यक्त केली.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply