पनवेल : प्रतिनिधी
शिक्षण, आरोग्य आणि ग्रामविकासाच्या संदर्भात उल्लेखनिय व भरीव काम करणारे पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळचे सरपंच सदाशिव वास्कर यांचा सरपंच परिषद मुंबईच्या वतीने मानाच्या ’राज्यस्तरीय आदर्श सरपंच’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. अहमदनगर येथे शुक्रवार (दि. 22) झालेल्या समारंभात त्यांना आदर्श गाव योजनेचे प्रदेश कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, माजीमंत्री सुरेश धस, आमदार प्रशांत बंब, आमदार निलेश लंके, अंमलबजावणी संचालनालयाचे सह आयुक्त उज्वलकुमार चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सरपंच सदाशिव वास्कर यांनी लोकप्रतिनिधी म्हणून विविध शासकीय योजना राबविण्याबरोबरच अनेक उपक्रम ग्रामपंचायत हद्दीत राबविले आहेत. मातृपितृ पूजन दिवस गावामध्ये साजरा करून जवळपास 350 आई-वडिलांची त्यांच्या मुलांकडून व लेकी सुनांकडून विधिवत पूजा केली जाते. लेक वाचवा, लेक वाढवा अभियानांतर्गत नवजात मुलींच्या स्वागतासाठी पाच हजार रुपयांचा धनादेश आणि तुळशीचे रोपटे देऊन मुलींचा सन्मान वाढविण्याचे काम केले जात आहे. वृक्षारोपण व संवर्धन, अलौकिक कार्य करणार्या महिलांचा तसेच हरिपाठ मंडळ, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा गौरव, विविध शिबिरे, कोरोना काळात अन्नधान्य वाटप, रोग प्रतिबंधात्मक फवारणी, सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत गावातील 124 मुलींची पोस्टामध्ये खाते उघडून त्यांच्या नावावर प्रत्येकी 2500 रुपये दरवर्षी जमा केले जात आहेत. गावातील मुलगी सासरी गेल्यावर तिच्या नावाने आनंदी माहेरवाशीण वृक्ष लागवड करून त्या झाडाला तिच्या नावाची पाटी लावली जाते. पुरुषांकडून महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि गृहलक्ष्मीचा सन्मान व्हावा यासाठी ’एक दिवस आराम आईसाठी… एक दिवस गृहलक्ष्मीसाठी‘ हा उपक्रम यशस्वीरीत्या गावामध्ये राबविला जातो. त्या दिवशी घरातील सर्व कामे पुरुषमंडळी करत महिलांना सन्मान दिला जातो. लोकसहभागातून गावदेवी मंदिर व सभोवतालच्या परिसराचे सुशोभीकरण व सभा मंडप तयार करण्यात आला आहे. ओपन जिम, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्र चिकित्सा शिबीर, निराधार महिलांना दहा टक्के अनुदान योजना, माझी वसुंधरा योजनेतून नदीवर बंधारा बांधण्यात आला आहे. त्याचा पाणी अडविण्यासाठी आणि जिरवण्यासाठी मोठा फायदा होत आहे. बंबावी गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून आरओ प्लांट बसवून शुद्ध पाणी पुरवठा केला आहे. विद्यार्थ्याच्या उत्कर्षासाठी तज्ञ व्यक्तींकडून स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीर, अशा विविध प्रकारची समाजोपयोगी कार्ये सरपंच सदाशिव वास्कर आणि कुंडेवहाळने करत समाजात आदर्श काम केले आहे. त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे यंदाचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी उपसरपंच जागृती वास्कर, सदस्य विनोद भोईर, दत्तात्रेय पाटील, ऋषिकेश वास्कर, करिष्मा वास्कर, ग्रामसेवक संजय बडे, रंजना वास्कर, माजी उपसरपंच आर. आर. वास्कर, सुदाम वास्कर, प्रीती वास्कर, गणेश कडू, कैलास वास्कर, प्रवीण पाटील, सुभाष म्हात्रे, तुषार पाटील, काशिनाथ पाटील, विनायक वास्कर, संजय भोईर, हासुराम वास्कर, हरेश्वर भोईर, लहू कातकरी, संकेत म्हात्रे, केवल भोईर यांच्यासह 50 पेक्षा अधिक ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते. दरम्यान या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थांकडून सरपंच सदाशिव वास्कर व ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन केले जात आहे.