Breaking News

पनवेलमध्ये रोटरी उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठा डेंस ग्रीन फॉरेस्ट प्रकल्प

महापालिकेच्या विशेष सभेची परवानगी

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका हद्दीत प्रभाग क्रमांक 19मध्ये हळदीपूरकर हॉस्पिटलजवळ डेंस ग्रीन मियावाकी फॉरेस्टचा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा प्रकल्प उभारण्यासाठी रोटरी क्लबला भूखंड देण्यास बुधवारी (दि. 27) झालेल्या विशेष सभेत अनुमती देण्यात आली. यामुळे हा परिसर हिरवागार तर होईलच, शिवाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षांचा रहिवास वाढून त्याचा फायदा पर्यावरणालाही होणार आहे.
पनवेल महापालिकेची विशेष सभा बुधवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त कैलास गावडे उपस्थित होते.
पूर्वाश्रमीच्या नगर परिषदेमार्फत सहा वाणिज्य संकुलातील 30 वर्षांच्या कालावधीसाठी भाडे तत्त्वावर देण्यात आलेले गाळे लीज करारनामा व हस्तांतर करणे या 19 एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत स्थगित ठेवलेल्या विषयाला मान्यता देण्यासाठी बुधवारची विशेष सभा घेण्यात आली होती.
या वेळी सहा व्यापारी संकुलातील 355 व्यापारी गाळे हे विद्यमान गाळेधारकांना तत्कालीन नगर परिषद कायद्याप्रमाणे निविदा पद्धतीने व आरक्षणानुसार वाटप करण्यात आलेले असल्याची माहिती उपायुक्तांनी दिल्यावर त्याला मान्यता देण्यात आली.
पनवेल महापालिका हद्दीतील महापालिकेच्या मालकीचा शहरातील भूखंड क्रमांक 273 हा डेंस फॉरेस्ट तयार करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलला देण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यामध्ये हरित क्षेत्र विकसित करण्यासाठी महापालिका कोणताही मोबदला देणार नाही. वृक्षारोपणाच्या आराखड्यास महापालिकेची परवानगी घ्यायची असून तेथील झाडांची देखभाल 11 महिने रोटरी क्लबने विनामोबदला करायची आहे.
अशी आहे मियावाकी पद्धत
सामान्य वनांच्या तुलनेत मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येणार्‍या वनांमधील झाडे ही अधिक वेगाने वाढतात. सामान्य पद्धतीने लावलेले झाड वाढण्यास जेवढा कालावधी लागतो, त्या तुलनेत साधारणपणे निम्म्यापेक्षा कमी कालावधीत तेवढ्याच उंचीचे झाड वाढते. साधारणपणे दोन वर्षांत विकसित होणार्‍या मियावाकी पद्धतीच्या वनांमध्ये झाडांमधील अंतर हे कमी असल्याने ती घनदाट असतात. या वनांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीची साधारणपणे दोन किंवा तीन वर्षे या वनांची नियमित देखभाल करावी लागते. त्यानंतर ही वने नैसर्गिकरित्या वाढत राहतात आणि अव्याहतपणे प्राणवायू देत राहतात. यामध्ये फळझाडे, फुलझाडे, औषधी गुणधर्म असणारी झाडे अशा विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. प्रामुख्याने चिंच, पळस, करंज, बेहडा, सावर, रतनगुंज, साग, सीताफळ, बेल, पारिजातक, कडूनिंब, बांबू, पेरू, पुत्रजीवा, सीता अशोक, हरडा, खैर, जांभूळ, मोह, बहावा, सुरु, बदाम, रिठा, शिसम, बकुळ, अर्जुन, फणस, आवळा, कदंब यासारख्या विविध प्रकारची झाडे यात असतात.

भूखंड क्रमांक 273 हा उद्यानासाठी राखीव होता. तो रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलला डेंस फॉरेस्ट तयार करण्यासाठी देण्यास मंजुरी देण्यात आली. सध्याच्या काळातील महाराष्ट्रातील सर्वांत मोठा डेंस ग्रीन मियावकी फॉरेस्टचा हा प्रोजेक्ट आहे. यामुळे पनवेलमध्ये हरित क्षेत्राचे प्रमाण वाढेल  पक्षू-पक्ष्यांचे प्रमाण वाढेल आणि या परिसराला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
-परेश ठाकूर, सभागृह नेते, पनवेल महानगरपलिका

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply