Monday , June 27 2022
Breaking News

पोलादपुरातील शेतीबाबत बळीराजापुढे यक्षप्रश्न

देशातील सुमारे 65 टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बर्‍याच अन्नघटकांचा पुरवठा या भागातून होत असतो. तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशु-पक्ष्यांचे खाद्य व औद्योगिकदृष्ट्यादेखील भाताचे अनेक उपयोग होतात. त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी सहाय्यक ठरणार्‍या विशेषत: सुधारित भात जातीच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ शिफारसीनुसार सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर मशागत, लावणी व योग्य तंत्रज्ञान पीक संरक्षण उपायांचा अवलंब इत्यादी बाबींवर विशेष भर द्यावा लागणार आहे.तसेच संकरित भात निर्मितीसारख्या आधुनिक तंत्रझानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. आपल्या राज्यात तसेच कोकणात खरीप व उन्हाळी हंगामात भाताची लागवड केली जाते. पोलादपूर तालुक्यातील भातशेती करणार्‍या शेतकर्‍यांना आतापर्यंत विविध समस्यांना सामोरे जावे लागत असताना अनेकदा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडूनही सुटणार नाहीत अशा समस्यादेखील उद्भवत आहेत. शेतकरी भातशेती अनेक वर्षापासून करत आहेत, तरीसुध्दा राज्याच्या सरासरी उत्पादकतेशी तुलना करता पोलादपूर तालुक्याची उत्पादकता कमी असून त्यास विविध कारणे आहेत.

भात उत्पादनातील महत्त्वाच्या समस्या :

1.सुधारित व अधिक उत्पादन देणार्‍या भात जातीच्या लागवडीखाली असलेले कमी क्षेत्र.

2.सेंद्रिय व रासायनिक खतांचा कमी व असंतुलित वापर.

3.किड रोग व तण नियंत्रण उपायांचा अल्प प्रमाणात वापर.

4.वेळेवर व पुरेशा प्रमाणात शेतमजुरांच्या उपलब्धतेतील अडचणीमुळे रोपे लावणी करताना लागणारा अधिक कालावधी.

5.राज्यातील भातशेती करणारे सुमारे 80 ते 85 टक्के अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि त्यांची विखुरलेली भातशेती यामुळे यांत्रिकीकरणाचा कमी प्रमाणात वापर

6.समुद्रकिनार्‍यालगतच्या खार जमिनीत अनियमित व अपुर्‍या अथवा जादा पावसामुळे होणारे नुकसान.

7.वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पोहोचण्यासाठी खत पुरवठ्यातील अडचणी व लागणारा विलंब.

8.सुधारित भात लागवडीच्या तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यांपर्यंत होणारा अल्प प्रमाणातील प्रचार.

9.अतिबारीक लांब दाण्याची व सुवासिक भात जाती भरडण्यासाठी लागणार्‍या सुधारित भात गिरण्यांची लागवड क्षेत्रातील अपुरी उपलब्धता.

भातपिकाच्या पध्दती :

1.पूर्वमशागत-पहिल्या पिकाच्या कापणीनंतर लवकरच पहिली नांगरणी करावी. पाऊस पडल्यावर पुन्हा आडवी नांगरणी करावी आणि दुसर्‍या नांगरणीद्वारे हेक्टरी 7.5 टन कंपोस्ट खत एकसारखे मिसळावे. चिखलणीच्यावेळी हेक्टरी 5 टन गिरीपुष्प (हिरवळीचे खत) शेतात मिसळावे. यामुळे 50 टक्के नत्र खताची बचत होते.

2.बीजप्रक्रिया-बियाणे पेरणीपूर्वी प्रथम मिठाच्या 3 टक्के द्रावणात बुडवुन घ्यावे.जे बियाणे पाण्यावर तरंगते ते हलके आणि खराब असल्याने वेगळे करावे आणि तळाशी असणारे बियाणे लगेच पाण्यातून काढून स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत सुकवावे. त्यानंतर प्रतिकिलो बियाण्यास 2.5 ग्रॅम प्रमाणे थायरम हे बुरशीनाशक चोळावे व नंतर बियाणे पेरणीसाठी वापरावे. यामुळे उत्पादन वाढेल.

3.भात पेरणीसाठी- विविध सुधारित पध्दती- यामध्ये 1)ड्रम सिडर, 2)रहु पध्दत, 3)टोकण पध्दत, 4) चारसुत्री पध्दत, 5)सगुणा भात तंत्रज्ञान, 6)पट्टा पध्दत यांचा समावेश आहे.

4.रोपवाटिकेचे व्यवस्थापन-जमिनीचा उतार लक्षात घेऊन उंच निचर्‍याच्या जागी तळाशी 120 सेंमी व पृष्ठभागी 90 सेंमी रुंदीचे 8 ते 10 सेंमी. उंचीचे उतारानुसार योग्य त्या लांबीचे गादी वाफे तयार करावेत. वाफ्यांना प्रति गुंठा क्षेत्रास एक कि. ग्रॅ. युरिया आणि तीन कि. ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे.

5.लावणी-खरीप हंगामात 12 ते 15 सेंमी उंचीची 5 ते 6 पाने फुटलेली जातीच्या पक्वता कालावधीनुसार 20 ते 27 दिवसांची रोपे लावणीसाठी वापरावीत. रब्बी हंगामात पेरणीनंतर 35 ते 40 दिवसांची रोपे लावावीत.एस.आर.टी.पध्दतीच्या तत्त्वानुसार आपल्या विभागात 15 दिवसांच्या रोपांची लावणी पाणी कमी साठणार्‍या क्षेत्रात केल्यास पुर्नलागवड वेळेत आटोपत व उत्पादकतेत भरीव वाढ होते. लावणी सरळ आणि उथळ (2.5 ते 3.5 सेंमी खोल) करावी. उथळ लावणी केल्याने फुटवे चांगले येतात. एका चुडात तीन रोपे लावावीत. संकरित भातासाठी एका चुडात एकच रोप लावावे.

6.खताचे व्यवस्थापन-भातास हेक्टरी 100 किलो नत्र 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे.(100:50:50)1.चिखलणीच्या वेळी 40:50:50, 2.फुटवे येण्याच्या वेळी 40 किलो नत्र (लावणीनंतर 30 ते 40 दिवसांनी), 3.पीक फुलोर्‍यात असताना 20 किलो नत्र (लावणीनंतर 60 ते 70 दिवसांनी)

7.आंतरमशागत व पाण्याचे नियोजन-पाणी निचरणार्‍या शेतात तणांचा उपद्रव कमी करण्यासाठी ब्यटॅक्लोर तणनाशकाचा हेक्टरी 1.5 किलो क्रियाशील घटक 600 लीटर पाण्यात द्रावण पाठीवरील नॅपसॅक पंपाद्वारे लावणीनंतर 4 दिवसांनी मागे चालत येत फवारावे. लावणीनंतर पहिल्या 30 दिवसांपर्यंत शेतात पाण्याची पातळी 2.5 ते 5 सेंमी ठेवावी. यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. लोंब्या येण्यापुर्वी 10 दिवस व आल्यानंतर 10 दिवसापर्यंत शेतातील पाण्याची पातळी 10 सें.मी. ठेवावी.पिकातील दाणे भरेपर्यंत पाण्याची पातळी 5 से.मी. ठेवावी. त्यानंतर कापणीपूर्वी 8 ते 10 दिवस शेतातील पाणी काढुन टाकावे. 8.कापणी-सुमारे 90 टक्के दाणे पिकल्यावर व रोपे हिरवट असतानाच वैभव विळ्याने जमिनीलगत कापणी करावी. मळणीनंतर दोन ते तीन उन्हे देऊन धान्य वाळवावे. भाताची कापणी उशिरा केल्यास लोंबीच्या टोकाचे चांगले भरलेले दाणे शेतात गळून पडतात. भात कांडपाचे वेळी कणीचे प्रमाण वाढते. पेंढ्याची प्रत खालावते आणि पेंढा कमी मिळतो म्हणून पिकाची कापणी वेळेतच करावी, असे मार्गदर्शन नेहमीच पोलादपूर तालुका कृषी कार्यालयामार्फत शेतकर्‍यांना मिळत असूनही दरवर्षी वेगळ्याच समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने शेतकर्‍यांना शेतीबाबतचे आकर्षण राहिले नाही. पोलादपूर तालुक्यात गेल्या काही वर्षांमध्ये अतिवृष्टीमुळे नद्या नाल्यांशेजारील शेतजमिनी वाहून जाणे, डोंगरउतारावरील शेतजमिनी अथवा दरडी वाहून येणे आणि खालील बाजूच्या शेतजमिनींमध्ये दरडीचा मलबा साठणे, रानडुक्करांच्या कळपांकडून शेतीची नासधूस केली जाणे, अवर्षण काळामुळे दुबार पेरणी करावी लागणे, पाऊस दीर्घकाळ लांबल्याने हातातोंडाशी आलेल्या भातपिकाच्या लोंब्या जमिनीवर कोसळून त्यातून पुन्हा अंकूर फुटण्याच्या घटना होणे, लष्करी अळी आणि किडींची टोळधाड येऊन पिक रातोरात फस्त करणे अशा अनेक वेगळया समस्यांना सामोरे जावे लागले आहे. अशावेळी भातपिक विमा योजना काढलेल्या शेतकर्‍यांना भरपाई मिळू शकते, मात्र संपूर्ण हंगामात शेतीमध्ये राबूनही हाती काही नाही आल्यास शेतकर्‍यांची मानसिकता खचत जाते.

-शैलेश पालकर

Check Also

नागरी समस्यांबाबत भाजपची तत्परता

कळंबोलीतील उघड्या गटारांना झाकणे बसविण्याची मागणी सभापती प्रमिला पाटील यांचे सिडकोला निवेदन कळंबोली : रामप्रहर …

Leave a Reply