स्थानिक कलावंत देशपातळीवर चमकावेत -आमदार प्रशांत ठाकूर
पेण : प्रतिनिधी
पेण फेस्टिवल गेली 12 वर्षे गाजत असून, लोकप्रिय होऊन महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचला आहे. हा जिल्ह्याचा उत्सव ठरून येथील स्थानिक कलावंत देशपातळीवर चमकावेत, असे प्रतिपादन सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते पेण फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.
स्वररंगतर्फे पेण नगर परिषदेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या पेण फेस्टिवलचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार महेंद्र दळवी, तसेच विजय कवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. उद्घाटन समारंभास नगराध्यक्षा प्रीतम पाटील, भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, शहर अध्यक्ष हिमांशु कोठारी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, जि. प.चे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, नगरसेविका शहनाझ मुजावर, शर्मिला पाटील, भाजप महिला तालुकाध्यक्ष प्रचिता पाटील, यशवंत घासे, जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे, स्वररंगचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र साळवी आदी उपस्थित होते.
पेण फेस्टिवलमधील विविध स्पर्धांच्या माध्यमातून प्रत्येकाला कलागुण दाखविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील समस्यांना, तसेच कलावंतांना न्याय मिळाला पाहिजे, असे सांगून, हा फेस्टिवल एक तप यशस्वी करून कलावंतांना व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल स्वररंगचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र साळवी व त्यांच्या सहकार्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कौतुक केले.