एक कोटी 95 लाखांच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप
अकोला : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर शहर कोतवाली पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील रस्ते कामात अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिली होती. त्या तक्रारीवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करीत मंत्री कडूंवर बुधवारी (दि. 27) पहाटे गुन्हा दाखल झाला. मंत्र्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठवलेल्या रस्त्याच्या कामाच्या प्रस्तावांमध्ये परस्पर बदल करून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री बच्चू कडू यांनी एक कोटी 95 लाख रुपयांच्या निधीचा अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दाखल करण्यात आली होती, मात्र पोलिसांनी कारवाई न केल्याने डॉ. पुंडकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 156 (3) अंतर्गत अकोला न्यायालयात प्रकरण दाखल केले. पालकमंत्री लोकसेवक असल्याने गुन्हा दाखल करण्यासाठी 90 दिवसांच्या आत राज्यपालांची परवानगी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. दरम्यान, वंचितच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. राज्यपालांनी कायद्यानुसार दस्तऐवज सादर करण्याचे त्यांना सांगितले तसेच नियमानुसार कारवाई करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले होते.
अखेर कायद्यातील तरतुदीनुसार न्यायालयाने मंगळवारी पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधातील तक्रारीवर तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. या प्रकरणात शहर कोतवाली पोलिसांनी मंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात भादंवि कलम 405, 409, 420, 468, 471 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. त्यामुळे मंत्री कडू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.