कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नगरसेविका हेमलता गोवारी आणि जवाहर इंडस्ट्रियल इस्टेट यांच्या वतीने रवी गोवारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत सायकल वाटप कार्यक्रम बुधवारी (दि. 27) आयोजित करण्यात आला होता. ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि हस्ते हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, विजय चिपळेकर, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, के. के. म्हात्रे, ओबीसी मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, न्यू इंग्लिश स्कूलचे व्हाईस चेअरमन सुधाकर पाटील, रमेश तुपे, भाजप भटके विमुक्त महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विद्या तामखडे, युवा मोर्चा अध्यक्ष कामोठे शहर हर्षवर्धन पाटील, तेजस जाधव, रवी भगत यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनीही भेट दिली.
रयत शिक्षण संस्था ही गोरगरीबांना हात देणारी संस्था आहे, असे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी केलेे. त्यांनी आपल्या भाषणात रवी गोवारी आणि हेमलता गोवारी यांनी केलेल्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले व अशीच कामे येणार्या काळातही सुरू ठेवा, असे म्हटले तसेच सर्वांनी त्यांना आदर्श घेऊन कामे करीत रहा, असा सल्ला दिला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, ज्या परिस्थितीमध्ये आपण शिक्षण घेतले त्याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. आई-वडिलांच्या आठवणींबरोबरच समाजातील ज्या ज्या चांगल्या माणसांनी आपल्याला मदत केली आहे त्यांचीही आठवण आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे.