Breaking News

नवीन पनवेलमध्ये सुटीच्या दिवशी पर्यावरणपूरक बससेवा होणार सुरू

परिवहनच्या उपक्रमामुळे 60 ते 70 लाखांची बचत

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

पयार्वरणपूरक वाहतुकीच्या दिशेने नवी मुंबई परिवहन उपक्रमाचा प्रवास सुरू आहे. रविवारी सुटीच्या दिवशी फक्त विद्युत व सीएनजी बसमधून प्रवासी वाहतुकीच्या प्रयोग यशस्वी होत असल्याने आता शनिवार, रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी ‘नो डिझेल बस’चा निर्णय एनएमएमटी प्रशासनाने घेतला आहे. जानेवारीपासून सुरू असलेल्या या उपक्रमातून परिवहनची महिन्याला 60 ते 70 लाखांची बचत होत आहे. प्रदूषणातील अत्यंत घातक घटक असलेल्या कार्बनचे प्रमाण कमी करण्याचा निर्धार नवी मुंबई पालिकेने केला आहे. त्या दृष्टीने विविध उपाययोजना सुरू आहेत. पालिका वापरत असलेली वाहने तसेच एनएमएमटीच्या ताफ्यातील सर्व वाहने ही विद्युत अथवा सीएनजी इंधनावरील करण्यात येत आहेत. सध्या परिवहन उपक्रमात 180 विद्युत, 120 सीएनजी आणि 272 डिझेलवर चालणार्‍या बस आहेत. या सर्व बसमधून दररोज प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे. मात्र डिझेल दरवाढीमुळे परिवहनचा तोटा वाढला आहे. त्यामुळे परिवहन उपक्रमाने जानेवारीपासून एक नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. रविवारी फक्त विद्युत व सीएनजी बसमधूनच प्रवासी वाहतूक केली जात आहे. 15 जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या या नवीन उपक्रमामुळे इंधनापोटी 60 ते 70 लाखांची बचत होत आहे.

 

15 जानेवारीपासून रविवारी सार्वजनिक सुटीच्या दिवशी विद्युत व सीएनजी बसचा वापर केल्यामुळे शनिवारी व रविवारी प्रत्येकी आठ हजार लिटर याप्रमाणे 16 हजार लिटर म्हणजेच एका महिन्यात 64 हजार लिटर पेट्रोलची बचत होत आहे. यातून महिन्याला 60 ते 70 लाख रुपयांची बचत होत आहे. त्यामुळे सुटीच्या दिवशी पर्यावरणपूरक बस चालवण्यात येणार आहे.

-योगेश कडुस्कर, परिवहन व्यवस्थापक

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply