उरण : वार्ताहर
उरण तालुक्यात विशेष सहाय्य योजनेंतर्गत मार्च 2022पर्यंत एकूण 1,356 लाभार्थ्यांना वर्षभरात एक कोटी 62 लाख 72 हजार रक्कम देण्यात आली अशी माहिती नायब तहसिलदार संदीप खोमणे यांनी दिली. दरम्यान शासनाच्या गोरगरिबांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना गट अ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरागांधी विधवा निवृत्ती वेतन योजना व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अशा विविध योजना आहेत. या अंतर्गत उरण तालुक्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना एकूण लाभार्थी 794, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना गट अ लाभार्थी 122, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना लाभार्थी 138, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना लाभार्थी 22 आदी सर्व योजनेतून 1,356 लाभार्थी आहेत. त्यांना वर्षभरात एक कोटी 62 लाख 72 हजार रक्कम देण्यात आली आहे. गुरुवार (दि. 28) उरण तालुक्यातील चिरनेरजवळील मीना सुनील कातकरी (रा. आक्कादेवी वाडी), दर्शना चंद्रकांत कातकरी (रा. आक्कादेवी वाडी) यांना राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतून प्रत्येकी 20 हजार रुपयांचा धनादेश नायब तहसीलदार खोमणे यांच्या हस्ते देण्यात आला.