Breaking News

अंदाज समितीकडून अधिकार्‍यांची झाडाझडती

अलिबागमधील काचळी-पिटकिरी खारभूमी कामाची पाहणी

अलिबाग : प्रतिनिधी

विधीमंडळ अंदाज समिती तीन दिवसांच्या रायगड दौर्‍यावर आली होती. या समितीने राज्य शासकिय योजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. तसेच काही प्रकल्पांना भेटी दिल्या. काही  योजनांच्या अंमलबजावणीत त्रुटी आढळल्यामुळे समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रश्न-उपप्रश्न विचारून अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली. त्यामुळे अधिकार्‍यांची भंबेरी उडाली. रणजित कांबळे यांच्या अध्यक्षतेखालील अंदाज  समिती रायगडच्या दौर्‍यावर आली होती. राज्य शासनाच्या योजना राबविण्यासाठी दिलेला निधी योग्य प्रकारे खर्च झाला आहे किंवा नाही, कामाचा दर्जा कसा आहे, योजना व्यवस्थित राबविल्या गेल्यात किंवा नाही याची माहिती या समितीने घेतली. अल्पसंख्यांक विकास (औकाफ), शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, सार्वजनिक  बांधकाम, कृषी, पशुसवंर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय या विभागांतर्गत राबविण्यात येणारे राज्य शासनाचे प्रकल्प, योजना, कामे यांची माहिती या समितीने घेतली. तसेच काही प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटी देऊन पहाणी केली. काही योजना प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या नाहीत. त्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना समितीच्या सदस्यांनी झापले. ही समिती आपला अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे. समितीने गुरूवारी (दि. 28) विविध प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटी दिल्या.  अलिबाग तालुक्यातील काचळी-पिटकिरी योजनेच्या बंधार्‍याची पाहणी केली. राष्ट्रीय चक्रीवादळ, धोके निवारण प्रकल्पांतर्गत रायगड जिल्ह्यातील सहा योजनांसाठी 114 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे. यातील अलिबाग तालुक्यातील काचळी-पिटकीरी ही योजना आहे. या योजनेला विधीमंडळाच्या अंदाज समितीने भेट दिल्यावर खारभूमी विभागाचा गलथान कारभारावर सदस्यांनी खारभूमीच्या अधिकार्‍यांना चांगलेच झापले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी खारभूमी विभागाच्या अधिकार्‍यांमुळे येथील पिकत्या भात शेतीची कशाप्रकारे वाट लागते आहे तसेच ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करीत आहे याची वस्तुस्थिती समितीसमोर मांडली. समितीने खारभूमीच्या अधिकार्‍यांना फैलावर धरत रखडलेल्या कामाचा आणि झालेल्या खर्चाचा जाब विचारला. हे काम का रखडले आहे, याचा अहवालही अधिकार्‍यांना अंदाज समितीकडे पाठवावा लागणार आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply