उरण : प्रतिनिधी : राज्यशासन गेली अनेक वर्षे करोडो रुपये खर्च करून गाळमुक्त धरण अभियानांतर्गत गाळ काढण्याचे उद्दिष्ट साध्य करीत आहे. यासाठी शासन व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून विविध प्रकल्पांच्या सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून अशी अभियाने राबवित आहे. राज्यातील धरणे व जलसाठ्याच्या साठवण क्षमतेत वाढ व्हावी म्हणून धरणातील गाळ काढून तो शेतात वापरण्यासाठी राज्य सरकारने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अशी योजनाही हाती घेतली आहे. त्याअंतर्गत रानसई धरणाचा गाळ काढून तो स्वच्छ करावा अशी मागणी होत आहे. उरण तालुक्यातील नौदल शास्त्रागारासाठी 1960 मध्ये बांधण्यात आलेल्या रानसई धरणाला आता 49 वर्षे पूर्ण होत आहेत. नौदल शास्त्रागाराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी सांभाळत असताना पुढे उरण तालुक्यात निर्मिती झालेल्या ओएनजीसी वायुविद्युत केंद्राच्या प्रकल्पाव्यतिरिक्त तालुक्यातील अन्य राष्ट्रीय प्रकल्प बरोबरच उरण शहरासह तालुक्यातील 25 गावांना या धरणामधून पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता 10 एमसीएम एक हजार कोटी लिटर पेक्षा अधिक आहे, परंतु 49 वर्षात धरणात सातत्याने गाळ साठून राहिल्याने आता या धरणाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता घटली आहे. त्याच बरोबरीने पाण्याची वाढती मागणी, पाण्याची गळती, चोरी या सार्या गोष्टी लक्षात घेतल्या, तर एमआयडी सीला पाण्याची उसनवारी करावी लागेल. विद्यमान परिस्थितीचा विचार करता उरण तालुक्याची लोकसंख्या सुमारे दोन लाखापेक्षा अधिक असून उरणमध्ये औद्योगिकीकरणामध्ये वाढ होत आहे. स्मार्ट सिटीकडे पदार्पण करताना या परिसरात आता उत्तुंग इमारतींची उभारणी वेगात होत आहे. याचा अर्थ येत्या पाच वर्षात लाखाच्या संख्येने निर्मिती झालेल्या सदनिकांमध्ये तितक्याच पटीने लोकसंख्या वाढणार आहे. या सर्वांसाठी पिण्याचे पाणी, दैनंदिन वापराचे पाणी हे अत्यावश्यक आहे. यामुळे सध्या तालुक्यातील सर्वात मोठे धरण असणार्या रानसई धरणातून व पुनाडे धरणातून पाणीपुरवठा अपुरा पाडत असल्याने नवी मुंबईच्या पेण येथील हेटवणे धारणामधून उरणसाठी सुमारे आठ एमएलडीपेक्षा अधिक पाण्याची उधार उसनवारी करावी लागत आहे. उरण तालुक्यातील विविध प्रकल्पातून राखीव ठेवण्यात येणार्या सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून रानसई धरणाचा गाळ काढणे त्याचबरोबर उरणामधील पुनाडे धरणाची डागडुजी करणे, गाळ काढणे इत्यादी कामे करू शकतात. पाण्याचा प्रचंड साठा साठवून ठेवण्याची क्षमता असूनही ही दोन्ही धरणे उपेक्षित राहिली आहेत.
Check Also
उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात
उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …