पनवेल : प्रतिनिधी
केंद्र शासन व महाराष्ट्र आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आदेशान्वये पनवेल महानगरपालिका अंतर्गत असणार्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 1 एप्रिल ते 15 एप्रिलदरम्यान स्वच्छता पंधरवडा राबविण्यात आला. या वेळी महापालिकेच्या चारही प्रभागांमध्ये, महापालिकेच्या शाळांमध्ये विविध कार्यक्रम राबविण्यात आले.
महापालिका हद्दीतील गावांमध्ये व झोपडपट्टी परिसरात जावून स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले. महापालिका क्षेत्रातील शाळांमधील किशोरवयीन मुलींना मासिकपाळी दरम्यान स्वच्छता कशी पाळायची याचे वैद्यकीय अधिकार्यांनी मार्गदर्शन केले. जैववैद्यकीय कचरा विलगीकरणाचे प्रशिक्षण आशा स्वयंसेविका व स्वच्छतादूत यांना देण्यात आले. हात स्वच्छ कसा धुवावा यांचे प्रात्यक्षिक शाळांमधील विद्यार्थ्यांना, गाव आणि परिसरातील लोकांना देण्यात आले. याबरोबरच महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना चांगला पोषक आहार व निरोगी जीवनशैली याचे मार्गदर्शन विविध पोस्टर्स, रांगोळ्या, प्रत्यक्ष फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्य यांच्या माध्यमातून करण्यात आले.
प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता श्रमदान व स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी प्रभातफेरी काढण्यात आली. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतील अधिकारी व कर्मचार्यांनी रस्त्यांची, परिसराची साफसफाई केली. या पंधरवड्याच्या शेवटच्या दिवशी खारघर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ’स्वच्छता’ या विषयावर रांगोळी स्पर्धा ठेवण्यात आली होती. यामध्ये सर्व नागरीक प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कर्मचार्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.