केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांचे आश्वासन
नवी मुंबई : प्रतिनिधी
अखिल भारतीय कश्यप, कहार, निषाद, भोई व कोळी समाजाच्या अडचणी व समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करण्यात येईल, तसेच त्या समस्या सुटण्यासाठी या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर समस्या मांडल्या जातील, असे आश्वासन केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी ऐरोली येथे दिले.
ऐरोली येथील ऐरोली स्पोर्ट्स क्लब येथे राष्ट्रीय कोळी महासंघाचे अध्यक्ष, आमदार रमेश पाटील व कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष विधीज्ञ चेतन पाटील यांच्या वतीने अखिल भारतीय आदिवासी कश्यप, कहार, निषाद, भोई व कोळी समन्वय समितीचे देशस्तरिय 13वे दोन दिवशीय अधिवेशन सुरू झाले. त्यावेळी उद्घाटनपर भाषणात केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती बोलत होत्या.
या वेळी व्यासपीठावर जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री काविंदर गुप्ता, युपीचे राज्य मंत्री रामकेश निषाद, राम गोपाल कश्यप, राज्यसभा खासदार जयप्रकाश निषाद, आमदार गणेश नाईक, आयुर्वेदाचार्य स्वामी गोरखनाथ, माजी आमदार राम कुमार, रघुनाथ कश्यप बरोबरच नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत, आयोजक आमदार रमेश पाटील, विधीज्ञ चेतन पाटील सहित राज्यातील आमदार, माजी आमदार, खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आमदार गणेश नाईक यांचेसुध्दा तडाखेबाज भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारने सुरू केलेल्या जन कल्याणकारी योजनांबाबत विस्तृतपणे सांगितले, तसेच आयोजक आमदार रमेश पाटील व विधीज्ञ चेतन पाटील यांच्या सामाजिक कामाविषयी कौतुक केले.
या अधिवेशनाचा उद्दिष्ट्य ज्या राजकीय पक्षात कार्यरत असणार्या समाजाला उमेदवारी मिळवून देणे. त्यानंतर त्याच्या विजयासाठी पूर्ण समाज काम करेल, राष्ट्रीय जनगणना समुदायाच्या आधारावर व्हावी, आरक्षण मिळावे, कश्यप महामंडळाची निर्मिती करणे आदी विषयावर वक्त्यांनी भाषणात मत मांडली. तसेच या अधिवेशनात संगठण, राजनैतिक, सामाजिक, न्यायिक, प्रशासनिक, फेडरलिजम या मुद्द्यावर दोन दिवसाच्या अधिवेशनात लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे आयोजक विधीज्ञ चेतन पाटील यांनी सांगितले.