वर्षभरात 12 हजार रोपे लावली जाणार
खालापूर : रामप्रहर वृत्त
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त टाटा स्टील कंपनीने आपल्या सावरोली (ता. खालापूर) प्लांट परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबविली. ओन्ली वन अर्थ अर्थात आपल्याकडे एकच पृथ्वी आहे या यंदाच्या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या विषयाला अनुसरून आपल्या वसुंधरेचे रक्षण करून, तिला जास्तीत जास्त हिरवीगार व सुदृढ बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन, परिवर्तनात्मक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे टाटा स्टीलने आपल्या या मोहिमेतून दर्शवले आहे. आपल्याकडे फक्त एकच पृथ्वी आहे आणि आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी एक देश, एक संघ म्हणून एकत्र येऊन काम केले पाहिजे. कंपनीने या ठिकाणी अधिकाधिक झाडे लावावीत व पर्यावरण संरक्षण, संवर्धनाच्या जास्तीत जास्त उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर यांनी या वेळी केले. पर्यावरण व्यवस्थापनासंदर्भात टाटा स्टीलकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी व्ही. व्ही. किल्लेकर यांनी कौतुक केले. खालापूरचे बीडीओ महादेव शिंधे, राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष संजय कदम, सचिव संतोष बैलमारे, सावरोलीच्या सरपंच प्राची प्रदीप लाड, उपसरपंच नागेश मेहतर यांच्यासह कामगार या वेळी मोठ्या संंख्येने उपस्थित होते.
पर्यावरण पूरकता आणि शाश्वत विकासाच्या आमच्या उपक्रमांचा एक भाग म्हणून आम्ही या प्लांटमध्ये आणि परिसरात सुमारे 45 हजार झाडे लावली आहेत. अधिक हरित भविष्य निर्माण करण्यासाठी येत्या वर्षभरात अजून 12 हजार रोपे आम्ही लावणार आहोत.
-कपिल मोदी, कार्यकारी प्लांट प्रमुख, टाटा स्टील खोपोली