कल्याण ः प्रतिनिधी : गस्तीदरम्यान पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. रवी दाढी असे या गुन्हेगाराचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. रवी दाढीविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
कोळशेवाडी पोलिसांचे पथक गस्त घालत असताना विजयनगरसमोरील मैदानात रवी दाढी हा पिस्तूलसारखे हत्यार घेऊन गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि. शाहूराज साळवे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस पथकाने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत सापळा रचत रवी दाढीला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व तीन जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आली आहेत. कोळसेवाडी पोलीस स्थानकात रवीविरुद्ध सहा गुन्हे दाखल असून यापैकी तीन प्रकरणांत तो फरार होता. रवी या परिसरात नेमक्या कोणत्या उद्देशाने आला होता याचा तपास पोलीस करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिली.
उल्हासनगरमध्ये हत्यारासह एकाला अटक
काही दिवसांपूर्वी शस्त्रविक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला 28 मार्चला पोलिसांनी अटक केली होती. या तरुणाकडून एक पिस्तूल आणि दोन गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले होते. या प्रकरणी न्यायालयाने तरुणाला पोलीस कोठडी सुनावली होती.
उल्हासनगरमध्येही गुन्हेगारी वाढली असून एका आठवड्यात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत दोन पिस्तूल व दोन गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी शस्त्र पकडल्याने खळबळ उडाली आहे. शहाड रेल्वे उड्डाणपूल परिसरात एक जण शस्त्र्रविक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार तरडे यांनी उड्डाणपूल परिसरात पोलीस पथक स्थापन करून सापळा लावला. 28 मार्च रोजी दुपारी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते. या संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल, दोन गावठी कट्टे आणि तीन जिवंत काडतुसे मिळाली होती. गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला ताब्यात घेतले होते. गोविंद सिंग भदोरिया उर्फ राहुल असे ताब्यात घेतलेल्या संशयित व्यक्तीचे नाव होते.