तीन महिन्यांत सर्व मंजुर्या मिळविण्याचे निर्देश
पनवेल : नितीन देशमुख
गुजरात परिवहन महामंडळाच्या सूरत येथील आगाराप्रमाणे पनवेलचे एसटी आगार बांधणार. या बसपोर्टमध्ये तळमजल्यावर बस थांबा, प्रवाशी विश्राम कक्ष. दुसर्या मजल्यावर बस डेपो व महामंडळाचे कार्यालय तर तिसरा आणि चौथा मजला व्यवसायिकांसाठी असे नियोजन केले असल्याचे तत्कालीन परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले होते. हे काम 2020मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. बांधकाम नियमात बदल झाल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने या आराखड्याला दुरूस्ती सुचवण्यात आल्याचे सांगण्यात आले. आता महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चेन्ने यांनी नवीन आराखडा एक महिन्यात महापालिकेकडे पाठवण्यात येणार असून तीन महिन्यांत सर्व मंजुर्या मिळवून बांधकामाला सुरुवात करण्यात यावी, असे निर्देश दिल्याने आता 2022मध्ये तरी आगाराचे कामाला सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्या पनवेलमधून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ येथून येणार्या-जाणार्या एसटीच्या गाड्या पनवेल स्थानकावर येत असतात त्यातून दररोज हजारो प्रवाशी येत-जात असतात. याशिवाय नोकरी-धंद्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून हजारो नागरिक या स्थानकातून प्रवास करतात. त्यासाठी पनवेल आगारातून रोज 72 नियते चालवली जातात. त्यापैकी अहमदनगर व शिर्डी ही फक्त दोन लांब पल्ल्याची व 70 गाव खात्यातील आहेत. त्यासाठी 165 चालक व 159 वाहकांची नेमणूक करण्यात आली आहे. रोज 5000 पेक्षा जास्त गाड्या या स्थांनाकात येत असताना महामंडळाने मात्र पनवेल आगाराकडे दुर्लक्ष्च केले आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीद पनवेलकर प्रवाशांच्या बाबतीत एसटीने पाळलेले अद्याप दिसत नाही. नैना प्रोजेक्टमुळे पनवेलचे महत्त्व वाढले आहे. रेल्वेचे टर्मिनन्स ही पनवेल येथे होणार आहे. त्यामुळे पनवेलचे महत्त्व वाढत आहे. येथील नागरीकरणाच्या वाढण्याचा वेग पाहून येथील एसटी आगाराचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव काँग्रेस राजवटीत करण्यात आला. त्यावेळी 80 कोटीच्या कामाला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजुरी दिली नाही. भाजप-सेना युतीचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गुजरात परिवहन मंडळाच्या सूरत येथील आगाराप्रमाणे पनवेलचे एसटी आगार बीओटी तत्वावर बांधण्याचा निर्णय घेऊन नवीन 280 कोटींचा प्रस्ताव तयार केला. एसटी महामंडळाने पनवेल आगार आधुनिक पोर्ट बनवण्याचा निर्णय घेतला. बीओटी तत्वावर बांधण्यासाठी मास्क ट्रांझीट कंपनीला काम देण्यात आले आहे. यासाठी 230 कोटी रुपये खर्च येणार आहे. या एजन्सिचे वास्तू रचनाकार, इंजिनियर आणि एसटीचे कार्यकारी अभियंता विनीत कुळकर्णी, विभाग नियंत्रक सुपेकर व इतर अधिकार्यांनी 17 मे 2018 रोजी पनवेल स्थानकाला भेट देऊन तत्कालीन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि प्रवासी संघटनेच्या पदाधिकार्यांना बसस्थानकाचा आराखडा कसा असेल याची माहिती देण्यात आली. सध्या ज्या जागेत डेपो आहे त्याठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. यामध्ये मॉल, पीव्हीआर आणि इतर व्यावसायिक असतील. आपले 30 महिन्यांचे शेड्यूल कसे असेल. त्या काळात गाड्या कोठून सोडल्या जातील, कोणत्या अडचणी येतील यावर चर्चा केली. महापालिकेला यासाठी लागणारी मदत आणि आवश्यक ना हरकत दाखले देण्याचे आदेश आमदारांनी संबंधिताना दिले होते, पण ठेकेदाराने फक्त महामार्गाच्या बाजूला काही भागात फक्त पत्रे लावून ठेवले. त्यानंतर आता चार वर्षांनी पुन्हा महामंडळाला जाग आली असून व्यवस्थापकीय संचालकांनी मास्क ट्रांझीट कंपनीच्या अधिकार्यांशी मुंबईला बैठक घेऊन एक महिन्यात नवा आराखडा तयार करून महापालिका व संबंधित विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता पावसाळा सुरू होईल त्यामुळे चार महिने काम सुरू होण्याची शक्यता नाही, पण डिसेंबरअखेरपर्यंत तरी पनवेल आगाराचे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी चिन्हे आहेत.
असे असेल एसटी आगार
17,500 स्क्वे. फुटाचे बस पोर्ट असेल यामध्ये तळमजल्यावर वाहतूक नियंत्रक कक्ष, प्रवाशी विश्राम कक्ष, आणि बस थांबा, त्यामध्ये 30 फलाटांची रचना केलेली आहे. प्रवासी फलाटावरून गाडीच्या दरवाजात विमाने प्रमाणे जातील. प्रवाशी आजूबाजूच्या मोकळ्या जागेत जाऊ शकणार नाही. दुसर्या मजल्यावर महामंडळाचे कार्यालय तर बेसमेंटला पार्किंग व दुरूस्ती विभाग. बाजूला अधिकारी व कर्मचार्यांसाठी निवासस्थाने असे नियोजन करण्यात आले आहे. बस स्थानकातून रेल्वे स्टेशनपर्यंत एव्हीलेटर बांधण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दोन्हीकडे जाणे-येणे सोपे होणार आहे. या कामाला सुरुवात झाल्यापासून 24 महिन्यांत काम पूर्ण करायचे आहे. काम वेळेत पूर्ण न झाल्यास एजन्सीला मोठा दंड आकारण्यात येणार आहे.