नवीन राइड्स, म्युझिकल लेझर शो नवीन प्रमुख आकर्षण
नवी मुंबई ः बातमीदार, प्रतिनिधी
उद्यानांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवी मुंबईतील नेरूळस्थित वंडर्स पार्क हे थीम गार्डन शहरातील आणि शहराबाहेरील पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण आहे. मागील दोन वर्षे वंडर्स पार्कच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते ते आता जवळजवळ पूर्ण होत आले आहे. कामाच्या सद्यस्थितीचा पाहणीदौरा शुक्रवारी (दि. 17) माजी महापौर सागर नाईक यांनी केला. या वेळी त्यांच्यासमवेत माजी महापौर जयवंत सुतार, माजी सभागृह नेते आणि स्थानिक नगरसेवक रवींद्र इथापे, माजी सभापती डॉ जयाजी नाथ, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी नगरसेविका सुरेखा इथापे, माजी नगरसेवक सुनील पाटील, विनोद म्हात्रे, गणेश म्हात्रे, गिरीश म्हात्रे, माजी नगरसेविका शिल्पा कांबळी, माधुरी सुतार, माजी परिवहन सभापती प्रदीप गवस, समाजसेवक गणेश भगत, रणजित नाईक, सुभाष गायकवाड, महापालिकेचे कार्यकारी अभियंता गिरीश गुमास्ते, उपअभियंता पंढरीनाथ चवडे आदी उपस्थित होते.
या पाहणी दौर्यादरम्यान सागर नाईक यांनी वंडर्स पार्कमध्ये ज्या ठिकाणी देखभाल आणि दुरुस्तीची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी तशा प्रकारची कामे करण्याची सूचना केली. कोरोना काळामध्ये वंडर्स पार्क नागरिकांसाठी बंद करण्यात आले होते. महापालिकेच्या मावळत्या सभागृहाने या थीम पार्कच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामाला मंजुरी दिली होती. दोन वर्षांपूर्वी हे काम सुरू झाले होते, मात्र ते धीम्या गतीने सुरू आहे. सुमारे 23 कोटी रुपये खर्च करून वंडर्स पार्कमध्ये नवीन खेळणी, नवीन राइडस बसविण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर म्युझिकल लेझर शो हे नवीन आकर्षण पर्यटकांना पाहावयास मिळणार आहे. लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या माध्यमातून नवी मुंबईत विविध थीम पार्क आणि उद्याने उभारण्यात आली आहेत. वंडर्स पार्क हे महाराष्ट्रातील एकमेव प्रख्यात असे पर्यटन स्थळ आहे. वंडर्स पार्क सुरू करण्यापूर्वी पर्यटकांच्या सुरक्षेची काटेकोर काळजी घेण्याची सूचना सागर नाईक यांनी महापालिकेच्या अधिकार्यांना केली. खासकरून ज्या राइडस आहेत त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करून घेण्यास सांगितले. निष्काळजीपणामुळे कोणताही अपघात होता कामा नये, असे ते म्हणाले.
माजी महापौर जयवंत सुतार यांनी वंडर्स पार्क पुन्हा खुले झाल्यानंतर या माध्यमातून पालिकेच्या उत्पन्नात भर पडेल, अशी प्रतिक्रिया दिली. माजी सभागृह नेते तथा स्थानिक नगरसेवक रवींद्र इथापे यांनी सांगितले की, वंडर्स पार्कचे जवळजवळ 95 टक्के काम पूर्ण झालेले आहे. पाच टक्के विद्युत विषयक कामे बाकी आहेत. ती देखील येत्या काही दिवसात पूर्ण होतील. मुलांच्या परीक्षा देखील संपणार आहेत त्यामुळे वंडर्स पार्कचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून हे पार्क जनतेसाठी खुले करावे.