निर्माता सुधाकर बोकाडेला एका गोष्टीची विलक्षण हौस मौज होती. आपल्या नवीन चित्रपटाचा मुहूर्त, त्याचे मुंबईत वा आऊटडोअर्सला असलेले चित्रीकरण आणि आपल्या यशस्वी चित्रपटाची ग्लॅमरस ओली पार्टी यात आम्हा सिनेपत्रकारांनाही सहभागी करून घेणे. अशातच एके दिवशी सेठ स्टुडिओत लॉरेन्स डिसोझा दिग्दर्शित ‘साजन’च्या सेटवर त्याने आमंत्रित केले. सेटवर शिरलो तोच एका हाऊसफुल्ल प्रेक्षागृहात पाऊल पडले आणि नृत्य दिग्दर्शिका सरोज खान माधुरी दीक्षितला मै शायर हू मै तेरी शायरी (संगीतकार नदीम श्रवण. पाश्वगायिका अलका याज्ञिक) या गाण्यावरील नृत्य स्टेप्स समजावून सांगत होत्या. चित्रपटाच्या सेटवर माधुरी दीक्षितला लाईव्ह अर्थात प्रत्यक्षात नृत्य करताना पाहण्याचे मी मीडियात असल्यानेच असे काही सुवर्ण योग आले. माधुरी दीक्षित प्रत्येक स्टेपवर अधिकाधिक मेहनत करणार, कॅमेरामनशी संवाद करणार (दिग्दर्शक लॉरेन्स डिसोझा हा मूळचा छायाचित्रणकार. या चित्रपटाचा कॅमेरामन तोच होता.) लेन्स समजून घेणार, प्रचंड घाम गाळणार ही गोष्ट विशेष उल्लेखनीय.
आणि त्यात सेठ स्टुडिओ हा त्या काळातील एकमेव असा पूर्ण वातानुकूलित (एअर कंडिशन) स्टुडिओ असल्याने तुलनेत येथे कमी दमछाक. चित्रपटात काम करायचे म्हणजे मेहनत ही आलीच. त्याची चर्चा होत नाही इतकेच.
पश्चिम एक्स्प्रेस हायवेवर अंधेरीत हा स्टुडिओ होता. नेमके सांगायचे तर आज तेथे उंची गाड्यांचे शोरूम आहे. आम्ही सिनेपत्रकार व फोटोग्राफर नटराज स्टुडिओतून म्हणजे आतल्या बाजूने कॅन्टीनकडून पुढे सेठ स्टुडिओत जात असू.
बी.एस. शाद निर्मित व चेतन आनंद दिग्दर्शित ‘कुदरत’ (1981 साली मुंबईत प्रदर्शित)च्या मुहूर्त व पहिल्या चित्रीकरण सत्राने सेठ स्टुडिओचे उद्घाटन झाले. हा मुहूर्त 1979 साली झाला. कुदरत चित्रपटात राज कुमार, राजेश खन्ना, हेमा मालिनी, प्रिया राजवंश व विनोद खन्ना यांच्या प्रमुख भूमिका. मुंबईत 1977 साली गोरेगाव येथील अतिशय भव्य दिमाखदार दादासाहेब फाळके चित्रनगरी सुरू झाली. आणि पाठोपाठ सेठ स्टुडिओ सुरू झाला.
तोपर्यंत मुंबईतील परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओ, वांद्य्रातील मेहबूब स्टुडिओ, अंधेरीतील नटराज स्टुडिओ, अंधेरी पश्चिमेकडील आंबोली येथील फिल्मालय स्टुडिओ, महाकाली विभागातील कमालीस्तान स्टुडिओ, गोरेगाव पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद मार्गावरील फिल्मीस्तान स्टुडिओ, साकी नाका येथील चांदिवली स्टुडिओ, चेंबूरचा आर.के. स्टुडिओ, मानखुर्दचा एसेल स्टुडिओ, ग्रॅन्ड रोडचा ज्योती स्टुडिओ अशा काही चित्रपट स्टुडिओत अतिशय मोठ्याच प्रमाणावर चित्रीकरण सुरू असे. अनेक ठिकाणचे मेकअप रुम्स हे सर्वसाधारण स्वरुपाचे असत ही वस्तुस्थिती आहे. त्यातच एकाद्या मेकअप रुमला वातानुकूलित व्यवस्था असेल तर ती आपणास मिळावी यासाठी मोठे कलाकार आग्रही असत. आपल्या चित्रपटसृष्टीत व्हॅनिटी व्हॅन ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस आली आणि त्यात वाढ होण्यास बराच कालावधी लागला.
या सगळ्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे वातानुकूलित असलेला सेठ स्टुडिओ ही अतिशय महत्त्वाची व एक्स्युझिव्हज गोष्ट. स्टुडिओच्या मुख्य प्रवेशद्वारावर घर वा बंगला सजावटीच्या किमती वस्तूंचे एक मोठेच शोरूम होते.
सेठ स्टुडिओतील एक अतिशय भव्य फ्लोअरवर प्रसंगानुसार सेट लावून चित्रीकरण करायचे ही सर्वसाधारण पद्धत. वरच्या मजल्यावर चित्रीकरणासाठी आणखी एक मध्यम स्वरूपाची जागा होती. येथील मेकअप रुम्स अतिशय प्रशस्त होते. अशा उत्तम सुविधा असल्यानेच या स्टुडिओत कायमच चित्रीकरणाचा राबता असे. त्यामुळेच शूटिंग रिपोर्टींगसाठी कधीही जाता येत असे. ते दिवसच वेगळे होते. चित्रपटसृष्टी व प्रसार माध्यमात विश्वासाचे नाते होते.
1979 सालची गोष्ट. सेठ स्टुडिओत ‘कुदरत’चे पहिले चित्रीकरण सत्र सुरू असतानाच नटराज स्टुडिओत मुशीर रियाझ निर्मित व बासू चटर्जी दिग्दर्शित अपने पराये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. सेटवर शबाना आझमी, अमोल पालेकर, गिरीश कर्नाड, उत्पल दत्त, आशालता बावगावकर, भारती आचरेकर हे कलाकार चित्रीकरणात भाग घेत असतानाच आशालताना समजले, नटराज स्टुडिओच्या शेजारीच सेठ स्टुडिओ सुरू झाला असून ‘कुदरत’च्या चित्रीकरणात राजेश खन्ना आहे. आशालता लहानपणापासून राजेश खन्नाच्या जबरदस्त फॅन. त्यांना मनोमन वाटले, अगदी जवळच राजेश खन्ना शूटिंग करतोय तर आपण त्याला जाऊन भेटूयात. त्यांनी आपल्या सेक्रेटरीच्या मागे तगादाच लावला. अखेर त्याने आशालता यांना सेठ स्टुडिओत न्यायचे कबूल केले. नटराज स्टुडिओतून सेठ स्टुडिओत प्रवेश करताच बाहेरच राजेश खन्नाच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी पाहून त्या सुखावल्या. ते चाहते राजेश खन्नाच्या केवळ दर्शनासाठी आसुसलेले होते. राजेश खन्ना मात्र सेटवर राजकुमारसोबत दृश्य देत होत्या. आशालता सेटवर गेल्या. सेटवरच्या वातावरणाची त्यांना अर्थातच कल्पना होतीच. राजेश खन्ना या सेटवर असा काही बिझी होता की आशालता त्याला भेटू शकल्या नाहीत आणि त्यामुळे त्या बरेच दिवस नाराज होत्या, हे खुद्द आशालता यांनीच मला सांगितले.
सेठ स्टुडिओत सावनकुमार दिग्दर्शित सनम बेवफा या चित्रपटाचा झालेला मुहूर्त आठवतोय. त्या दिवसात सलमान खान व प्रेस फोटोग्राफर यांच्यातील तणावाचे प्रतिबिंब या मुहूर्तावर पडल्याचे जाणवले. या मुहूर्ताची बातमी मीडियात यायच्या आतच या चित्रपटातील नायिका बदलण्यात आली. आणि चांदनी या नवतारकेची वर्णी लागली.
सुनील शेट्टीने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले ते याच स्टुडिओत. पहलाज निहलानी निर्मित एक और भीम या नावाच्या चित्रपटाचा येथेच जंगी मुहूर्त झाल्याचे आठवतेय. सुनील शेट्टीच्या पोलादी शरीरयष्टीचा त्यात प्रत्यय आला. त्याने एका मोठ्या सेटवरून आपण चित्रपटसृष्टीत आलो आहोत याची यातून ओळख करुन दिली. प्रत्यक्षात हा चित्रपट बनलाच नाही. आपली चित्रपटसृष्टी अशा अनेक लहान मोठ्या गोष्टींसह वाटचाल करतेय. सुनील शेट्टीची अॅक्शनपॅक्ड भूमिका असलेल्या राजू मावानी निर्मित व दीपक आनंद दिग्दर्शित बलवान या चित्रपटाचा मुहूर्त व पहिले चित्रीकरण सत्र येथे रंगले. याच चित्रपटाच्या सेटवर दिव्या भारतीच्या मुलाखतीचा मला योग आला. दिव्या भारती म्हणजे आईकडून महाराष्ट्रीयन. आईचे आडनाव वाळिंबे. दिव्या छान मराठीत बोलायची यापेक्षा अतिशय रोखठोक बोलायची हे महत्त्वाचे.
या सेठ स्टुडिओत अनेकदा जाण्याचा मला योग आला. त्यातील दोन आठवणी सांगायलाच हव्यात. एक म्हणजे राजकुमार कोहली निर्मित व दिग्दर्शित ‘इन्सानियत के दुश्मन’च्या वस्तीच्या सेटवर राज बब्बर व डिंपल कापडिया यांच्यावरील नृत्याच्या चित्रीकरणात डिंपल छान नाचत होती, कॅमेरा मूव्हमेंटची तिला कल्पना होती. राज बब्बरची मात्र तारांबळ उडत होती. सारखे रिटेक व्हायचे. नृत्यात तो पारंगत नव्हता हे दिसत होते. कसेबसे या गाण्याचे चित्रीकरण पार पडले, पण त्यासाठी चक्क आठ दिवस लागले.
दुसरी आठवण विशेष आहे, मनोजकुमार आपला भाऊ राजीव गोस्वामीच्या देशवासी या चित्रपटाच्या चित्रीकरणात भाग घेत होता. हेमा मालिनीही सेटवर होतीच, पण आश्चर्याचा धक्का म्हणजे, महेश भट्ट या चित्रपटात एक कलाकार म्हणून सहभाग घेत होता. ही एक वेगळीच आठवण.
शैलेंद्रसिंग व टूटू शर्मा (पद्मिनी कोल्हापूरेचा पती) यांनी निर्मिलेल्या व सचिन पिळगावकर दिग्दर्शित पद्मिनी फिल्म प्रा. लिमिटेड व नंदिनी फिल्म निर्मित भुताचा भाऊ (1989) या चित्रपटाचा आठवणीत राहील असा मुहूर्त याच सेठ स्टुडिओत झाला. मला या गोष्टीचा विशेष आनंद झाला होता. या चित्रपटात अशोक सराफ, सचिन पिळगावकर, वर्षा उसगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, रेखा राव, भारती आचरेकर, विजू खोटे, सतीश तुंगारे, अनंत जोग, जॉनी लिव्हर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
साधारण 2000 सालापर्यंत हा सेठ स्टुडिओ कार्यरत होता. या काव्यात अनेक चित्रपटांचे मुहूर्त व चित्रीकरण येथे झाले. तो स्टुडिओ बंद झाला असला तरी आजही गुंदवली मेट्रो स्टेशन व पश्चिम एक्स्प्रेस हायवेवरून मी जातो तेव्हा हमखास माझी येथे आता असलेल्या शो रूमवर माझी नजर पडते आणि मला भुताचा भाऊ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त, बलवानच्या सेटवरची दिव्या भारतीची भेट या गोष्टी आठवतातच.
– दिलीप ठाकूर, चित्रपट समिक्षक
Check Also
नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …
RamPrahar – The Panvel Daily Paper