अलिबाग : प्रतिनिधी
डिजीटल पेमेंट केल्याचा बहाणा करीत फसवणूक करणार्या टोळीचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. भावेश पडीयार, अपूर्व गोहील, मोहीत राजपूत अशी त्यांची नावे असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.पोलिसांनी आरोपींकडून महागडी दारू, सोन्याचे दागिने, स्कोडा कार असा 13 लाख 19 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अलिबागमधील भैरव ज्वेलर्स या सोन्याच्या पेढीतून काही तरूणांनी सोने खरेदी केले. त्याचे डिजिटल पेमेंट करतो, असे त्यांनी सांगितले. पेमेंट केल्याचा एसएमएसही त्या व्यापार्याला मिळाला, मात्र हा एसएमएस बनावट होता. बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापार्याने पोलिसांत तक्रार केली. रायगड पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेतर्फे याचा समांतर तपास सुरू असताना काही धागेदोरे हाती लागले. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तीघाजणांना मुंबईतून अटक केली. हे तरुण सुशिक्षित असून त्यांनी रायगड जिल्ह्यासह मुंबई, नगर, गुजरात येथेही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर मुंबई आणि गुजरातमध्ये तीन गुन्हे दाखल आहेत. आता त्यांच्याकडून रायगडमधील पाच गुन्हे उघड झाले आहेत. त्यात अलिबाग व माणगाव पोलीस ठाण्यांत प्रत्येकी दोन तर कोलाडमधील एका गुन्ह्याचा समावेश आहे. नगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील एका गुन्ह्याचा छडा लागला आहे. आरोपी महागड्या, मोबाइल, महागडी घड्याळे, ब्रँडेड शूज, कपडे परिधान करून ते दुकानात प्रवेश करीत. महागड्या वस्तू खरेदी करत. पैसे देतेवेळी दुकानदाराकडे गुगल पे, फोन पे नंबर मागून घेत होते.
कोणताही डिजिटल व्यवहार करताना खात्री करून घ्या. व्यवहार करताना सावधानता बाळगा. आपल्या बँक खात्याशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकावर आलेल्या मेसेजची पडताळणी केल्यानंतरच ग्राहकाला वस्तू घेऊन जाण्याची परवानगी द्यावी.
-अशोक दुधे, पोलीस अधीक्षक, रायगड