Breaking News

काँग्रेस कार्यकर्ते गांधी परिवाराचे गुलाम

भाजपचे रामचंद्र घरत यांचा घणाघात

नवी मुंबई : बातमीदार

देशातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्थापन केलेल्या असोसिएटेड जर्नल लि. या कंपनीची दोन हजार कोटींची मालमत्ता हडप करणार्‍या गांधी परिवाराच्या बचावासाठी रस्त्यावर उतरून यंत्रणांवर दबाव आणणारे काँग्रेस कार्यकर्ते हे गांधी परिवाराचे गुलाम असल्याचे सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन भाजपचे रामचंद्र घरत यांनी केले आहे.

भ्रष्टाचारास पाठीशी घालणार्‍या या आंदोलनामुळे काँग्रेसचा खरा चेहरा देशासमोर आला असून भ्रष्टाचार आणि असत्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास सत्याग्रहाचा मुलामा चढवून काँग्रेसने महात्मा गांधींच्या मूल्यांना मूठमाती दिली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

पाच हजार देशभक्त स्वातंत्र्यसैनिकांनी जमा केलेल्या पैशातून स्थापन करण्यात आलेल्या ‘असोसिएटेड जर्नल’द्वारे चालविल्या जाणार्‍या ‘नॅशनल हेराल्ड’ या वृत्तपत्राकरिता देशात विविध ठिकाणी मिळालेली सुमारे दोन हजार कोटींची मालमत्ता हडप करण्यासाठी गांधी परिवाराने यंग इंडियन्स नावाची कंपनी स्थापन करून केवळ  50 लाखांत ही राष्ट्रीय संपत्ती हडप केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी सुनावणीकरिता राहुल गांधी यांना ‘ईडी’ने पाचारण करताच गांधी परिवाराचे भ्रष्ट रूप जाहीर होण्याच्या भीतीने काँग्रेसच्या मरगळलेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन यंत्रणांवर दबाव आणण्याकरिता सत्याग्रह आंदोलन सुरू करून जनतेस वेठीस धरण्याचा उद्योग चालविला आहे. भ्रष्टाचारी गांधी परिवाराची मर्जी सांभाळण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असून यासाठी देशाला वेठीस धरण्याचा काँग्रेचा डाव हाणून पाडला जाईल, असा इशाराही श्री. रामचंद्र घरत यांनी प्रसिद्धीसाठी जारी केलेल्या एका निवेदनाद्वारे दिला आहे.

राष्ट्रीय भावनेतून स्वातंत्र्ययोद्ध्यांनी आपल्या घामाचा पैसा ओतून उभारलेल्या नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राचा गळा घोटून गांधी परिवाराने या कंपनीची दोन हजार कोटींची मालमत्ता कवडीमोलाने घशात घातल्याच्या आरोपावरून न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.

या प्रकरणी जामीनावर मोकळे असलेल्यांनी आपल्या बचावासाठी पक्षाला वेठीस धरून आंदोलन करण्याचा आदेश देत दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला असला, तरी सत्य जनतेसमोर आल्याने आता भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असेही ते म्हणाले. गांधी परिवारा गुडघे टेकून देशाला वेठीस धरणार्‍या ‘काँग्रेसका हाथ भ्रष्ट परिवार के साथ’ आहे, हे या निमित्ताने उघड झाले आहे, असे ते म्हणाले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply