Breaking News

वाचनाने माणूस समृद्ध होतो

-रोहिदास पोटे, कवी/गझलकार/समीक्षक

तुम्ही वाचता तेव्हा तुम्ही काय करता? म्हणजे आपण वाचू लागलो आणि वाचत राहिलो तर आपल्या अस्तित्त्वामध्ये कोणते बदल होतात?  एक तर, तुमची आतली कवाडं उघडलेली असतात. ही कवाडं बाहेरून आत उघडणारी-स्वागतशील अशी असतात. बाहेरून काहीतरी त्या दरवाजाने आत, मेंदूपर्यंत, मनापर्यंत-कदाचित आत्म्यापर्यंत येऊ शकतं. आता ही आत येणारी ’वस्तू‘ किती मौल्यवान आहे, किती अस्सल आहे यावर वाचनाचा आनंद अवलंबून असतो. तुमचे संस्कार जागृत होऊन नव्याने अविष्कृत होत असतील तर हे वाचन चिरस्मरणीय असेच होत असते. वाचन म्हणजे जणू स्वतःचा शोधच असतो आणि आत्मशोध ही अपरिहार्य अशी अन् बहुधा अंतिम अशी मनाची अवस्था आहे. सुदैवी माणसाला त्यामुळे, आज ना उद्या वाचनाकडे वळावे लागते. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर वाचन माणसाला समृद्ध करते. दिलासा देते-कदाचित जगणे सुसह्य करते. नामवंत साहित्यिकांकडून या उत्तम साहित्यकृतींची या सदरातून आपल्याला ओळख करून देत आहोत…

मातीचा देह -डॉ. सुभाष कटकदौंड

मातीचा देह हा डॉ. सुभाष कटकदौंड यांचा कथासंग्रह  वाचनात आला. आयुष्यात घडून  गेलेल्या सत्य घटनांवर आधारित एकोणीस कथा आहेत. यातील एकएक कथा म्हणजे जीवन अनुभवण्याचा अर्क आहे. डॉ. सुभाष कटकदौंड हे स्त्रीरोग तज्ञ आहेत. त्यापेशातील अनेक घटनांचे कथाबीज घेऊन त्यांनी कथावृक्ष तयार केले आहेत. कथा वाचताना त्यातून व्यक्ती, प्रसंग, घटना, व्यक्तीचित्रणे या विविध कंगोर्‍यातून मन तृप्त आणि समृध्द होते. एक-एक कथा म्हणजे एक अनुभव आहे. या एकोणीस कथांची शिर्षके पाहिली तरी त्यातून त्यांचे कथाविश्व लक्षात येते. ’डॉक्टर माझे गर्भाशय मला परत हवंय‘!, ‘मातीचा देह’, ’घुसमट‘, ‘मुखत्यार शेख’, ’मायेचा स्पर्श‘, ’भूत‘, ’श्रीखंड‘, ‘आठवणीतले आधारकार्ड’, ‘फ ेबु्रवारी 1972‘, ‘शिळी भाकरी’ या सर्व कथा वाचताना ते प्रसंग, ते कथानक ती पात्रे नजरेसमोर उभी राहतात. डॉ. कटकदौंड यांची लेखणी समर्थ असल्याचे दिसून येते. संवेदनशील, सकारात्मकता, संस्कारशीलतेचा प्रत्यय येतो. पुन्हा पुन्हा वाचत राहाव्यात अशा या 19 कथा आहेत. त्या वाचतच राहाव्यात. मातीचा देह सचेतन होऊन जातो. महाजन पब्लिसिंग हाऊस पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

शाईचे गणगोत  -विष्णू सोळंके

‘शाईचे गणगोत‘ हे विष्णू सोळंके यांचे व्यक्तीचित्रणात्मक पुस्तक होय. विष्णू सोळंके हे अमरावतीचे लेखक, कवी, गझलकार, लेखक आहेत. एस.टी. खात्यातून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. पण ते कधीच कष्टी नाहीत. शाईने शब्दांना जीवंत करणारे लेखक, कवी, गझलकार, नाटककार व समाजसेवक म्हणजे ‘शाईचे गणगोत’ हे समर्पक शीर्षक घेऊन 36 महनीय व्यक्तींची चित्रणे त्यांनी रेखाटली आहेत. यात प्रामुख्याने वसंत आबाजी डहाके, डॉ. अशोक पळवेकर, कवी मधुकर केचे, प्रा. अरुण सांगाळे, प्रज्ञा गणोरकर, प्रा. गिरीश खारकर, कवी ग्रेस, विठ्ठल वाघ, सुलभा हेर्लेकर, अजीम नवाज राही, प्रा. बी. टी. देशमुख, सुरेश देशमुख, सुरेश भट अशा नामवंत, किर्तीवंत, यशवंत व्यक्तींची यशोगाथा त्यांनी उलघडून दाखविली आहे. हे 36 लेख वाचल्यानंतर सकारात्मक गुणाची भर पडल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाची नस पकडून विशेष उल्लेखनीय लिहिले आहे. त्यांची लेखणी देखणी आहे. हे ‘शाईचे गणगोत ’त्यांनी शाही थाटात सांगितले आहे. 36 व्यक्तींची चरित्रे वाचल्याचे समाधान मिळते. प्रेरणादायी, यशदायी, आणि आनंददायी व्यक्तींच्या आयुष्यातील महत्त्वाचे पैलू विष्णूजींनी विशद केले आहेत. अमरावतीच्या नभप्रकाशनची ही पुस्तक निर्मिती आहे. सगळ्यांनी वाचावे असे प्रेरक व भेदक पुस्तक.

एक कैफि यत -डॉ. बाळासाहेब लबडे

‘एक कैफि यत‘ हे डॉ. बाळासाहेब लबडे यांचे पुस्तक. हा गझलसंग्रह म्हणजे एक अनोखी भेट आहे. डॉ. लबडे हे कादंबरीकार, कवी व गझलकार आहेत. ‘एक कैफि यत‘ हा गझलेचा नजराणा आहे. गझल का वाचावी तर एकाच वेळी शेकडो कविता वाचण्याचा आनंद मिळतो. शेर हे गझलचे एकक. एक शेर म्हणजे एक स्वतंत्र कविताच होय. एका शेरात एक विशिष्ट खयाल भरलेला असतो. हा गझल संग्रह म्हणजे एकूण 87 गझलचा संग्रह एका गझलमध्ये कमाल सात/आठ शेर व किमान पाच शेर आहेत. सरासरी सहा शेर जरी पकडले तरी 525पेक्षा जास्त शेर म्हणजे तेवढ्या या कविताच या संग्रहात आहेत. शेरातील स्वतंत्र खयाल म्हणजे जगण्याचे सवाल आहेत. सामाजिक बांधिलकीच्या सर्जनात्मक विविध प्रतिमा प्रतिमांचा वापर करुन गझलांचा हा गझल त्यांनी केला आहे. गझलातील विविध शेर म्हणजे तत्त्वज्ञानांनी ठासून भरलेले उखळीचे बार आहेत गझलेच्या शेरातून वाचक रसिकांना वाचताना झटका बसतो तो कधी आनंदाचा कधी आत्मप्रत्ययाचा तर कधी अखिल मानव जातीच्या कल्याणाचा तो झटका असतो. गझलेतील तो खटका असतो तो असा आत्मप्रत्ययाचा झटका निश्चित देतो-

माणसाने असे जागले पाहिजे

माणसासारखे वागले पाहिजे

मी तुला पाहता तू मस्त भावले

एकमेकांवरी जीव ओवाळले

हे पुस्तक महाजन पब्लिसिंग हाऊस पुणे यांनी प्रकाशित केले.

उगमाकडे जाताना -प्रा. सुजाता राऊत

उगमाकडे जाताना हा काव्यसंग्रह प्रा. सुजाता राऊत यांचा आहे. त्या केवळ कवयित्रीच नाहीत. आधुनिक कविता म्हणजे 2000 नंतरच्या कवितेवर संशोधन करीत आहेत. संशोधन व समीक्षक म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांचा उगमाकडे जाताना हा काव्य संग्रह म्हणजे एक सुंदर निर्मिती आहे. एकूण 61 कवितांचा हा संग्रह वाचता वाचता वाचकाला स्वत:च्या उगम स्थानाकडे घेऊन जातो. ‘स्व‘चा शोध घेणे म्हणजे एक जीवघणे असते. स्वत:चे अस्तित्व आणि ‘स्व’चा उगम शोधताना मनाची होणारी स्पंदने आणि आंदोलने ही अनेक वलये निर्माण करतात. त्यांच्या कविताची काही शिर्षके पाहिली की कवियित्रीच्या संवेदनशील वृत्तीचा व सकारात्मक वृत्तीचा प्रत्यय येतो. ‘अश्रूंचे वय’, ‘काहीही वाटले तरी’,‘बाईला आवडते’, ‘चतकोर’,‘संवाद’,‘नातं तुटताना, ‘आजी सुरकुतल्या देहाची‘, ‘तिचं बंड’,‘रिकामा वर्ग’,‘उगमाक डे जाताना’अशी शिर्षके कवयित्रीच्या काव्यात्मक उत्कटतेचा प्रत्यय  देतात. मानवी मनाचा गुंता, मानवी नातेसंबध, स्त्री जाणिवांचा खोल डोह, या जाणिवा सुंदर प्रतिमांच्याव्दारा चित्रित केल्या आहेत. मुक्त घराची काय ताकद असते. त्याचे प्रत्यंतर या कविता वाचल्यावर येते. यातील काही ओळी-

बाईला आवडतं

नदी सारखं वाहणे,

थेट उमगापासून थेंबाथेंबाने

जीवनरस झिरपत ठेवणं.

बाईपण कसं असतं

त्वचेलाच चिकटलेलं

तिच्यात नकळत

तिच्या शिरांमध्ये भिजलेलं

मुळातून वाचाव्यात अशा या 61 कविता आहेत. कवयित्रीची ही काव्य यात्रा म्हणजे एक आत्मशोध आहे. वाचकालाही अंतर्मुख व्हायला लावते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply