रसायनी : प्रतिनिधी
कराडे खुर्द ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदाच्या उमेदवारीत तिरंगी लढत असून सरपंचपद हे अनुसूचित जाती महिला आरक्षित आहे. या निवडणुकीत भाजपच्या सरपंचपदाच्या उमेदवार भारती हेमंत चितळे व इतर प्रभागाचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटत आहे. आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली, विभागीय अध्यक्ष किरण माली आणि माजी सरपंच विजय मुरकुटे यांच्या प्रयत्नातून भाजपचा सरपंच भरघोस मतांनी निवडून येईल यात शंकाच नसल्याचे बोलले जात आहे.
कराडे खुर्द ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 23 जून रोजी होणार असल्याने प्रचाराची रणधुमाळी उडाली असून निवडणूक वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक एकमधून कासप ग्रामस्थांनी संगनमत करून प्रभागातील तीन्ही सदस्य बिनविरोध निवडून दिले, तर उर्वरित प्रभाग क्रमांक दोन व तीनची निवडणूक होत आहे. याकरिता भाजपच्या उमेदवारांनी कासप गावदेवी, कराडे खुर्द जाखमाता देवीला श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली व देवीला साकडे घातले. यावेळी भाजपच्या सरपंचपदाच्या उमेदवार भारती हेमंत चितळे (बॅट), सदस्य पदाचे उमेदवार नलिनी नथुराम कारंदे (जग), विजय वसंत मुरकुटे (गॅस सिलेंडर), सुचित्रा सुनील तुंगारे (टोपली), सुनीता रवींद्र चितळे (जग), यशश्री योगेश मुरकुटे (कपाट) यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांनी केले.
कराडे खुर्द ग्रामपंचायत परिसरात पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी परिसराच्या विकासासाठी उचललेले पाऊल पाहता विकासकामांच्या जोरावर मतदार कौल दर्शविणार असा विश्वास भाजपचे विभागीय अध्यक्ष किरण माळी व माजी सरपंच विजय मुरकुटे यांना आहे. रविवारपासून प्रचाराला खर्या अर्थाने सुरुवात होणार असून घरोघरी मतदारांना दाखविण्यासाठी निवडणूक यंत्र व मतदार प्रभागातून सायकलवरून प्रचार होणार असल्याचे विजय मुरकुटे यांनी सांगितले. कराडे खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन करण्यात आले आहे.