Breaking News

पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या इंग्रजी माध्यम शाळेचे उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेच्या लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयात इंग्रजी माध्यमाच्या ज्युनिअर केजीच्या वर्गाचे उद्घाटन शनिवारी (2 जुलै) उपमहापौर सीताताई पाटील यांच्या हस्ते सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगरसेविका दर्शना भोईर, शिक्षणाधिकारी बाबासाहेब चिमणे यांच्या उपस्थितीत झाले.
मुलांच्या स्वागतासाठी शाळेमध्ये सर्वत्र रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, फुगे लावण्यात आले होते. मुलांना गुलाबाचे फूल आणि चॉकलेट्स देऊन मान्यवरांनी  त्यांचे स्वागत केले तसेच त्यांचे वर्गात येताना औक्षण करण्यात आले. या सर्व वातावरणाने चिमुकली मुले भारावून गेली होती. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे शाळेचे शिक्षिक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.
या वेळी मुलांना दप्तर, वह्या, कंपास बॉक्स देण्यात आले. लवकरच त्यांना बूट आणि गणवेशही देण्यात येणार आहे. या वर्गामध्ये डिजिटल ब्लॅकबोर्डची सोय करण्यात आली आहे. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी 50 अर्ज आले होते. यातील 40 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.
उद्घाटन समारंभात पालकांना संबोधित करताना आयुक्त गणेश देशमुख म्हणाले की, सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी पनवेल महापालिका प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणजे ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली आहे. येथून पुढेही इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या विस्तारासाठी पालिका प्रोत्साहन देणार आहे.

शिक्षण क्षेत्रातही पनवेल महापालिकेचे नाव आदराने घेतले जावे. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्हाला नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे.
-परेश ठाकूर, सभागृह नेते, पनवेल महानगरपालिका

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply