
कडाव : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यामधील पोटल-आंबोट या गावांदरम्यान असलेल्या नैसर्गिक नाल्यावरील पुलाला अनेक वर्षापासून संरक्षक कठडे नाहीत. त्यामुळे या अरुंद पुलावरुन जाताना पादचारी आणि वाहन चालकांची मोठी कसरत होत आहे. संरक्षक कठड्या अभावी या ठिकाणी भविष्यात अपघात घडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
कर्जत शहरापासून सुमारे चौदा-पंधरा किलोमीटर अंतरावरील पोटल गावाची लोकसंख्या आठशेच्या घरात आहे. या परिसरात दुबार भातशेती केली जाते. नोकरी धंद्यासाठी शहरात जाणार्या येथील ग्रामस्थांना याच पुलावरुन प्रवास करावा लागतो. तसेच गावातील विद्यार्थ्यांना माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासाठी गौळवाडी येथे जाताना याच पुलावरुन आंबोटमार्गे जावे लागते. हा पुल अत्यंत अरुद व संरक्षक कठड्याविना असल्याने गेल्या वीस वर्षांपासून येथे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. अनेकवेळा बैल, गाय, म्हैस आदी पाळीव प्राणी या पुलावरुन खाली पडून शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अरुंद व संरक्षक कठडे नसलेल्या पोटल-आंबोट रस्त्यावरील पुलाकडे रायगड जिल्हा परीषदेचा बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींनी अनेक वर्षात लक्ष दिलेले नाही. या पुलाला संरक्षक कठडे किंवा लोखंडी पाईपचे रेलिंग बसवावेत, अशी मागणी या परिसरात जोर धरु लागली आहे.