Breaking News

चविष्ट, लज्जतदार मुठ्यांची आवक सुरू; मांसाहारी खवय्यांची विशेष पसंती

पाली ः प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात अखेर वरुणराजा बरसू लागला आहे. पावसाच्या हजेरीने चिंबोर्‍यांची एक जात असलेल्या मुठ्यांचे आगमन झाले आहे. त्यामुळे मांसाहारी खवय्यांची चविष्ट व लज्जतदार मुठ्यांची प्रतीक्षा संपली आहे. पावसाच्या सरींमुळे माळरान, शेत, डोंगरउतारावरील जमीन ओली झाली असून गवताची कोवळी पाती डोलू लागली आहेत. कोवळे गवत खाणारे व फक्त पावसाच्या सुरुवातीलाच बाहेर पडणारे मूठे आता वेळेआधीच बिळातून बाहेर आलेले पहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे तसेच चिकन-मटणाचे भावदेखील खूप वधारले आहेत. अशावेळी फक्त पावसाळ्यात बाहेर पडणारे मुठे खवय्यांना आकर्षित करतात. पौष्टिक आणि चवदार मुठ्यांना सध्या मागणी वाढत आहे. रात्रीच्या वेळी रिमझिम पाऊस पडू लागल्यावर मुठे पकडण्यासाठी लोक बाहेर पडतात. हातात गॅसबत्ती, टॉर्च किंवा जळता टायर घेतला जातो. सोबत मुठे ठेवण्यासाठी सिंमेटची पोती किंवा गोणपाट असते. माळराण, शेत, गवताळ भाग किंवा डोंगरउतारावर फिरून मुठे पकडले जातात. बत्तीच्या किंवा टॉर्चच्या उजेडात हे मुठे थांबतात. मग दबक्या पावलाने जाऊन त्यांना पकडले जाते. काही वेळेस बरेच फिरूनसुद्धा मुठे हाती लागत नाही. त्यासाठी निसर्गाची साथ असावी लागते. विकत आणण्यापेक्षा अनेक जण मुठे पकडणे पसंत करतात. मुठे विकून अनेकांच्या हाताला दोन पैसे मिळतात, तर काही जण मित्रपरिवाला भेट म्हणूनदेखील देतात. मुंबई, पुणे आदी शहरांध्ये राहणारे लोक गावाकडून हमखास मुठे नेतात किंवा आणायला सांगतात. शहरात 120 ते 100 रुपये डझन मुठे मिळतात, असे पालीतील खवय्ये व मुठे पकडणारे प्रवीण यादव यांनी सांगितले. दरम्यान, वाढते प्रदूषण, शहरीकरण व बांधकामे यामुळे मुठ्यांची निवास्थाने व अधिवास नष्ट होत आहे. त्याचप्रमाणे पावसाच्या अनियमितपणामुळेही प्रजोत्पादन कमी होऊन मुठ्यांची संख्या घटत आहे.

लज्जतदार व आरोग्यवर्धक

मुठे आकाराने लहान असले तरी त्यांचे मांस चविष्ट व आरोग्यवर्धक असते. मुठे वेगवेगळ्या प्रकारे आणि पद्धतीने बनवून खाले जातात. त्यातील सर्वांत प्रसिद्ध पद्धत म्हणजे मुठ्यांचे कवच काढून त्यामध्ये मूग, तांदूळ किंवा चण्याच्या पिठाचे मिश्रण भरले जाते. हे मिश्रण भरल्यावर धाग्याने पुन्हा कवच बांधून कालवण तयार केले जाते. आतील गराबरोबरच हे भरलेले मिश्रण लज्जतदार लागते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply