चढणीचे मासे पकडण्यासाठी मत्सप्रेमींची लगबग
पोलादपूर : प्रतिनिधी
तालुक्यात गेल्या 48 तासांत मुसळधार पाऊस पडून नाल्यांचे पात्र दुथडी भरून वाहू लागली असून या नदीपात्रालगतच्या चढणीवर नाल्या-शेतात अंडी-पिल्ले सोडण्यास येणार्या माशांची वलगण लागली आहे. ही वलगनीची मासळी पकडण्यासाठी ग्रामस्थ तसेच आदिवासी बांधवांची लगबग सुरू झाली आहे.
पोलादपूर तालुक्यात सावित्री, कामथी, घोडवनी, चोळई आणि ढवळी या पाच प्रमुख नद्यांची पात्रं अद्याप उथळच दिसत आहेत. गेल्या दोन तालुक्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे नाल्यांची पात्रं दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीकडे येणार्या ओहोळातून तसेच शेतीच्या पाण्याच्या पाटातून विरूध्द दिशेने शेताकडे जाऊन माशांनी अंडी सोडण्यास सुरूवात केली आहे. त्याला गावाकडे वलगण असे म्हणतात. खेडेगावांतील ग्रामस्थ आणि आदिवासी बांधवांनी ही वलगणीची मासळी पकडण्यासाठी पागविणे, बांधणं घालणे, खोचेरे मारणे आणि जाळयात पकडण्याचे विविध मार्ग अवलंबिले आहेत.
वलगणीमध्ये पोलादपूर तालुक्यात वांब, सकला, कटला, मुरगी, अहिर, खडशी, भिंग, मळ्याचे मासे, शिंगट्या, टोलकी, डाकू मासा, शिवड्याचे पातं असे मासे तसेच किरवी किंवा मुरी, मुठे (पांढरी खेकडे), झिंगे, चिंबोरी (लाल खेकडे) सापडतात. स्थानिक तसेच परगावी राहणार्या पोलादपूरकरांना या वलगणीचे विशेष अप्रुप वाटत असते.
महाड व पोलादपूर तालुक्यातील मत्स्यप्रेमी खवय्ये आवर्जून कापडे बुद्रुकच्या नरवीर तानाजी मालुसरे कमानीखाली बसलेल्या आदिवासी महिलांकडून अव्वाच्या सव्वा दर मोजून वेगवेगळ्या प्रकारचे वलगनीचे मासे खरेदी करताना दिसत आहेत. पोलादपूरच्या महाबळेश्वर रस्त्यालगतच्या मोरीच्या कठड्यावर येणार्या आदिवासी महिलांच्या टोपलीतील ताजे तडफडीत वलगनीचे मासे खवय्यांचे खास आकर्षण ठरत असल्याने दिवसाकाठी दोन-चार खेपा मारणार्या मासेखाऊंच्या मासेपुराणाच्या गप्पादेखील मनाजोगते मासे मिळेपर्यंत सुरू असतात. सध्या आषाढ महिन्यात अधिक मासे मिळत असल्याने वलगण करण्याचा उत्साह पोलादपूर तालुक्यात सगळीकडे दिसून येत आहे.