Breaking News

मुसळधार पावसाने सुधागड तालुका जलमय

 पालीत अंबा नदीचा रूद्रावतार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यात सलग मुसळधार पाऊस कोसळत आहे. पालीतील अंबा नदीने बुधवारी (दि. 6) धोक्याची पातळी ओलांडली होती. अतिवृष्टीने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा जोर वाढल्याने वाकण-पाली-खोपोली मार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलांना नदीच्या पाण्याने स्पर्श केला. काही तास सलग पाऊस कोसळत राहिला तर या पुलांवरून पाणी जाऊन  दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.

सुधागड तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सखल व खोलगट भागात पाणी शिरले आहे. तर नद्या, नाले, दुथडी भरुन वाहत आहेत. येथील गावांना जोडणार्‍या पुलांवरुन पाणी वाहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याचे दिसून आले. जांभुळपाडा ते कळंब आणि जांभुळपाडा ते माणगाव बुद्रुक रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने वाहतुक ठप्प झाली होती. रस्त्यांच्या दुतर्फा असलेली झाडे उन्मळून पडत आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे तालुक्यात पावसाचा जोर वाढत आहे. आभाळ फाटल्याप्रमाणे सतत कोसळणार्‍या धुवाधार पावसाने पाली आंबा नदी पुलाने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये, याकरीता तालुका प्रशासनाने पाली व जांभुळपाडा अंबा नदी पुलावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तहसीलदार दिलीप रायन्नावर व पोलीस निरिक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापनासह पोलीस प्रशासन दोन्ही पुलांवर प्रवासी व नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करीत होते.

सुरक्षिततेच्या दृष्टीने महसूल प्रशासन, आपत्ती व्यवस्थापनासह पोलीस प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये व सतर्क राहावे.

-दिलीप रायन्नावर, तहसीलदार, पाली-सुधागड

पेण तालुक्यातही वरुणराजाची बरसात

चांदेपट्टी ग्रामस्थांना स्थलांतराचे आदेश

पेण : प्रतिनिधी

तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पुढील काही दिवसांसाठी प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत. नदीकाठच्या गावांना तसेच डोंगरालागत असणार्‍या गावातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पेण तालुक्यातील चांदेपट्टी गाव अतिशय दुर्गम तसेच डोंगराच्या कुशीत वसले आहे. या गावाला दरड व भूस्खलनाची भीती असल्याने तेथील ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे या गावात दरड कोसळण्याच्या व जमिनीला तडे जाण्याच्या घटना घडत आहेत. त्याबाबत प्रशासनाला अनेक वेळा पत्र देवूनही त्याकडे कानाडोळा केला जात आहे. पहिल्या पावसात तात्पुरता स्थलांतर केले जाते.

चांदेपट्टी गावाचे सुरक्षीत ठिकाणी कायम स्वरूपी पुनर्वसन करावे, अशी मागणी तेथील ग्रामस्थ करीत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply