Breaking News

घरे उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारा बांधकाम व्यावसायिक ताब्यात

पनवेल, खारघर : वार्ताहर, प्रतिनिधी
सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या बांधकाम व्यावसायिकाची थेट कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. स्वप्नपूर्ती होम्स प्रायव्हेट लिमिटेड या वादग्रस्त कंपनीचा संचालक शरद अमृत मोझर याला प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विजय तळेकर यांच्या आदेशाने थेट कारागृहात पाठविण्यात आले आहे.
लिलावात काढलेली मालमत्ता विक्री न झाल्यामुळे पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी हा निर्णय घेतला. पनवेलमध्ये असे फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्याने हा फसवणूक करणार्‍या बांधकाम व्यावसायिकांना मोठा झटका मानला जात आहे. पनवेल तालुक्यातील विहिघर, नेरे, हरिग्राम आदी भागात गृहप्रकल्प उभे राहत असल्याचे भासवून स्वप्नपूर्ती होम्स या विकसक कंपनीने 2016 साली सुमारे 250 ग्राहकांची 6 ते 7 कोटींची फसवणूक केली होती. घर बुक करणार्‍या ग्राहकांकडून घराच्या किमतीच्या 20 टक्के रक्कम जमा करून प्रत्यक्षात गृहप्रकल्पाचे काम पूर्ण केले गेले नाही. घर बुकिंगसाठी गुंतवलेली रक्कम परत मागणार्‍या ग्राहकांना पैसे परत न केल्यामुळे ग्राहकांनी खांदेश्वर पोलिस ठाण्यात 2016 साली विकसक विरोधात गुन्हे दाखल केले होते. फसवणूक झालेल्या ग्राहकांनी केलेल्या तक्रारीनुसार रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिलेल्या आदेशाने संबंधित विकसक शरद अमृत मोझर यांच्याकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आले होते.
तहसीलदार विजय तळेकर यांनी विकसक मोझरच्या नेरे, हरिग्राम, विहीघर स्थावर मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव लावण्यात आला होता. परंतु भाग घेण्याकरिता कोणीही खरेदीदार न आल्याने नियमाप्रमाणे मालमत्तेची महसूल विभागाकडून 1 रुपया बोली मिळकत सरकारी दरबारी जमा करण्यात आली. दरम्यान, रायगड जिल्हाधिकारी आणि पनवेलचे प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनानुसार शरद अमृत मोझर याला 10 दिवसांचा कारागृह किंवा फसवणूक केलेली 7 ते 8 कोटी रुपयांची मिळकत जमा होईपर्यंत जेरबंद ठेवण्यात यावे असे आदेश दिले. त्यानुसार खांदेश्वर पोलिसांनी मोझर याला अटक करून त्याची तळोजा मध्यवर्ती कारागृह रवानगी करण्यात आली आहे .

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply