कर्जतच्या गुडवण येथील दुकानदाराचा प्रताप
कर्जत ः बातमीदार
तालुक्यातील गुडवण वाडीमधील आठ आदिवासी धान्य घेण्यासाठी आले असता, त्यांची रेशन कार्ड दुकानदाराने फाडून टाकल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून कार्डअभावी रेशनवरील धान्य न मिळण्यास या आदिवासींची उपासमार होऊ शकते.
गुडवण वाडीतील आठ आदिवासी हे रेशन घेण्यासाठी गुरुवारी (दि. 16) सकाळी गुडवण येथील रेशन दुकानात पोहोचले. त्या वेळी रेशन दुकानदार जगदिश कोंडू खडे यांनी या आदिवासी लोकांची रेशन कार्ड फाडून टाकली. काही वेळ या आदिवासींना काय सुरू आहे हे कळले नाही. रेशन कार्ड जेव्हा परत देण्यात आली, तेव्हा ती फाटलेली असल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. घाबरलेल्या आदिवासींनी ही बाब कर्जत पंचायत समिती सदस्य जयवंती हिंदोळा यांना दिली. हिंदोळा यांनी याबाबत कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांचे लक्ष वेधले आहे. तहसीलदारांनी माहिती घेऊन चौकशी करतो, असे सांगितले.