Breaking News

उसर्ली खुर्दच्या दोन माजी सरपंचांवर गुन्हा दाखल

बिल्डरांना बनावट परवानग्या देणे भोवले

पनवेल ः वार्ताहर 

उसर्ली खुर्द ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत बिल्डरांना बांधकामासाठी  अनधिकृत परवानग्या देणारे शेतकरी कामगार पक्षाचे तत्कालीन सरपंच प्रमिला मोहन भगत आणि विश्वास लक्ष्मण भगत यांना दणका बसला असून या दोघांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे करणार्‍या बिल्डरांचेही धाबे दणाणले आहेत.

पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्द ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच प्रमिला मोहन भगत आणि विश्वास लक्ष्मण भगत यांनी ग्रामपंचायतीचा ठराव न करता तसेच नैना (सिडको) प्राधिकरणाची परवानगी न घेता बांधकाम व्यावसायिकांना स्वतःच्या सह्यांनिशी बनावट बांधकाम परवाना देऊन पदाचा गैरवापर केला. याबाबत मच्छिंद्र आत्माराम पाटील व इतर ग्रामस्थांनी माहितीच्या अधिकारात ग्रामपंचायतीचे दफ्तर उपलब्ध करून ते 1 ऑगस्ट 2019 रोजी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे चौकशीसाठी सादर केले होते. यावर जिल्हा परिषद कार्यालयाकडून तीन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 23 डिसेंबर 2021च्या पत्रान्वये संबंधित सरपंचांवर कारवाई करण्यासाठी पनवेल पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना आदेश देण्यात आलेे.

जि. प. च्या आदेशानुसार पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी उसर्ली खुर्द ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आर. एम. ढेरे यांना अधिकार प्रदान करून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार संबंधित ग्रामसेवकांनी 17 मे 2022 रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात उसर्ली खुर्द ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच विश्वास लक्ष्मण भगत आणि प्रमिला मोहन भगत हे चौकशीअंती दोषी आढळून आल्याचे दिसून येत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी तक्रार दिली. त्या अनुषंगाने प्राप्त पुराव्याच्या कागदपत्रांची छाननी करून पनवेल शहर पोलिसांनी तत्कालीन सरपंच विश्वास भगत व प्रमिला भगत यांच्याविरुद्ध 1 जुलै 2022 रोजी भादंवि. कलम 420, 465, 466, 468, 471, 473, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यामध्ये नागरिकांची फसवणूक करणे, बनावट सरकारी शिक्के तयार करणे, ग्रामपंचायतीच्या बनावट लेटरहेडचा वापर करणे, सार्वजनिक अभिलेखांचा दुरूपयोग करणे, बनावट दस्त तयार करून तो खरा असल्याचा बनाव करणे, बनावटीकरण करणे आणि बिल्डर, विकसक, वास्तूविषारद यांच्याबरोबर संगनमत करून अनधिकृत बांधकामांना चालना देणे अशा प्रकारची कलमे लावण्यात आलेली आहेत. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक रजपूत करीत आहेत.

अशा प्रकारे उसर्ली खुर्द ग्रामपंचायत हद्दीत बांधकाम व्यावसायिकांनी नैना (सिडको) प्राधिकरणाकडून अधिकृत बांधकाम परवानगी न घेता बेकायदेशीरपणे बांधकामे केली आहेत. त्यात सरपंचांना बांधकामाची परवानगी देण्याचे अधिकार नसताना केवळ आर्थिक लोभापोटी बांधकाम व्यावसायिकांना नैना येण्यापूर्वीची तारीख टाकून ग्रामपंचायतीच्या बनावट परवानग्या देऊन मोठ्या प्रमाणात इमारतीची बांधकामे झाली आहेत व आजही सुरू आहेत. याबाबत नैना (सिडको) अतिक्रमणविरोधी विभाग यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रार व उपोषणाबाबतचे निवेदन देऊनही त्याकडे नैना प्राधिकरण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून बांधकाम व्यावसायिकांना संरक्षण देत आले आहे. त्यामुळे नैना (सिडको) प्रशासनास विकसन करापोटी मिळणारे अंदाजे 100 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांचीही खातेनिहाय चौकशी करणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

तत्कालीन दोन सरपंचांवर झालेल्या कारवाईमुळे नैना कार्यक्षेत्रातील बेकायदेशीर इमारत बांधकाम करणारे बिल्डरही गोत्यात आले आहेत, तर सामान्य गोरगरीब गुुंतवणूकदारांची, नागरिकांची वर्षानुवर्षे होणार्‍या फसवणुकीपासून सुटका होण्यास मदत होईल, असे ग्रामस्थांचे मत आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply