भारतीय गुंतवणूकदारांनी शेअरबाजारात गुंतवणूक केली पाहिजे, याविषयी दूमत नाही, मात्र जे आधीच मनात गैरसमज घेऊन बाजारात येतात, त्यांना बाजार धडा शिकवितो. त्यामुळे आपल्याला बाजारात काय करावयाचे आहे, याची स्पष्टता असणे फार महत्वाचे आहे. ही स्पष्टता तांत्रिक विश्लेषणामुळे येवू शकते.
ज्या कंपन्यांचे शेअर्स घ्यायचे त्यांचा अभ्यास हा दोन प्रकारे करू शकतो तो म्हणजे फंडामेंटल अॅनालिसीस (मूलभूत विश्लेषण) व तांत्रिक विश्लेषण(टेक्निकल अॅनालिसीस). यापैकी फंडामेंटल अॅनालिसिस म्हणजे काय हे आपण मागील लेखांत थोडक्यात पाहिलेलंच आहे तर आता या टेक्निकल अॅनालिसिस(ढ-) बद्दल जाणून घेण्याआधी आपण बाजारामध्ये येणार्यांची मानसिकता जाणून घेऊ म्हणजे टेक्निकल अॅनालिसिसचे महत्व अधोरेखित होईल..
निश्चित कोणतीही शिस्तबद्ध ठोस योजना नसताना अनेक लोक शेअरबाजारात येतात ते खालील गोष्टींच्या आधारे :
1) आजुबाजूचे घटक (बातम्या) – अनेक लोक जागतिक परिस्थिती, कच्च्या तेलाच्या किमती, सरकारी धोरणं, कंपन्यांचे निकाल, आर्थिक आकडेवारी यांच्या अंदाजावर आपले गुंतवणुकीचे निर्णय घेतात, जे फसवे असू शकतात.
2) लोकांच्या निर्णयानुसार स्वतःचे निर्णय – अनेक लोक या अनुषंगानं वागतात की इतरांबरोबर ते देखील गुंतवणूक करत असल्यानं त्यांना अनेक लोकांचा नैतिक पाठिंबा आहे कारण सर्व एकाच बोटीतून प्रवास करत आहेत त्यामुळं सर्वांचं जे होईल तेच माझे देखील होईल..
3) टिप्स – अनेक ब्रोकिंग हाऊसेस किंवा ऍडवायजर्स ग्राहकांच्या नफ्यावर नव्हे तर मिळणार्या ब्रोकरेजवर अथवा फीवर लक्ष केंद्रित करत आहेत. म्हणून ते टिप्स देतात आणि व्यवहार करायला भाग पाडतात. फारच कमी ब्रोकर्स किंवा ऍडवायजर्स गुंतवणूकदारांच्या बाजूनं विचार करत आहेत.
4) अफवा – अनेक लोक केवळ अफवांवर विश्वास ठेऊन आपली गुंतवणूक करतात. उदा. बॉम्बे वालेने ये शेयर लेने को बोला हैं.. किंवा यह स्क्रिप चलाने वाले हैं .., ऑपरेटर के खास आदमी ने बोला अमदाबाद से.. आज उपर के सर्किट में ले लो, लगातार 10 सर्किट मारेगा उपरके ..
5) लोभ आणि भीती – लोक एका मर्यादेपलीकडे घेतलेले शेअर्स सांभाळून स्टॉक ठेवतात किंवा कधीही पद्धतशीरपणे नफा पदरात पाडून घेत नाहीत. कोणतीच शिस्तबद्धता किंवा तंत्र नाही. मी असे लोक पाहिले आहेत ज्यांनी त्यांचा केवळ 10 महिन्यांत 5 पट झालेला पोर्टफोलिओ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स टाळण्यासाठी विकला नाही आणि नंतर बाजार कोसळल्यावर केवळ दीडपट नफ्यामध्ये तोच पोर्टफोलिओ विकावा लागला आणि त्यावर शॉर्टटर्म कॅपिटल गेन टॅक्स देखील आकारला गेला.. मराठीत शेअर बाजारासाठी एक म्हण आहे: लाभातून लोभात.
6) आवाक्याबाहेरचे व्यवहार – कधी कधी ब्रोकर्स गुंतवणूकदारांना इंट्रा डे ट्रेडिंगसाठी त्यांच्या गुंतवणुकीच्या 5 ते 10 पट पोझिशन्स घेण्याची मुभा देतात. जास्त नफ्याच्या उद्देशानं असे व्यवहार केले जातात परंतु नुकसान झाल्यास ते देखील अनेकपटीत असू शकतं.
7) गैरशिस्त – इंट्रा-डे साठी घेतलेली पोझिशन योग्य शिस्तीच्या अभावे थोडासा तोटा पदरात घेऊन व्यवहारपूर्ती न करता अशी पोझिशन दीर्घावधीसाठी डिलिव्हरी म्हणून घेतली जाते आणि इच्छा नसताना देखील सांभाळली जाते.
7) काहीतरी व्यापार करण्याची प्रवृत्ती – बरेच लोक इंट्रा-डे ट्रेडिंग करून पहिल्या अर्ध्या तासात जवळपास 10-20 हजार कमावतात. परंतु बहुतेक आवेशी लोक या ठिकाणी कधीच थांबत नाहीत. ते मिळवलेले 20 हजार पणास लावून दिवसभर या प्रवृत्तीनं व्यवहार करत राहतात की मिळाला तर अधिक फायदा अन्यथा नुकसान झाल्यास जे कमावलं त्यातूनच गमावलं जाईल..
8) जलद पैसा – लोकांची मानसिकता गुंतवणुकीपासून जुगारात बदलते कारण त्यांना सहज व जलद पैसे कमवायचे आहेत जे फारसे शक्य नाही.
लक्षात ठेवा गुंतवणूक हे शास्त्र असून एक कला देखील आहे..
9) नुकसान वसुली करा (सूड व्यवहार) – सामान्यतः लोक त्यांचं झालेलं पूर्वीचं नुकसान एकाच फटक्यात भरून काढण्यासाठी आवाक्याबाहेरची लीव्हरेज पोझिशन घेतात. पण या कृतीच्या दुसर्या धोकादायक बाजूचा ते कधीच विचार करत नाहीत की यावेळीही त्यांना पुन्हा तोटा झाल्यास काय होईल ??
10) नकारात्मक मानसिकता – अनेकजण हीच भावना उराशी बाळगून शेअरबाजारात येतात की मी घेतलेला शेअर खालीच येतो आणि विकल्यानंतर वरती..
नक्कीच टेक्निकल अॅनालिसिस या सर्वांवर उत्तम उपाय आहे.
टेक्निकल अॅनालिसिसचे फायदे
फंडामेंटल अॅनालिस्ट्स व टेक्निकल अॅनालिस्ट्स यांमध्ये नेहमीच शीतद्वंद्व पाहावयास मिळतं. प्रत्येकास आपला पाया अधिक प्रभावी वाटतो. माझं म्हणणं असतं की, गुंतवणूक करताना एखादी चांगली कंपनी निवडण्यासाठी फंडामेंटल अॅनालिसिसचा आधार घ्यावा व अशा निवडलेल्या कंपनीचे शेअर्स कोणत्या भावात खरेदी करावेत यासाठी टेक्निकल अॅनालिस्ट्सचा आधार घ्यावा. नक्कीच तांत्रिक विश्लेषणानं आपल्याला या भावांचा अंदाज बांधता येतो की कोणत्या भावात एखादा शेअर खरेदी करावा अथवा विकून बाहेर पडावं.
- टेक्निकल अॅनालिस्ट्सच्या सहाय्यानं आपण कोणत्याही शेअर्ससाठी योग्य (अचूक नाही) प्रवेश पातळी (एन्ट्री लेव्हल) व निर्गमन पातळी (एक्झिट लेव्हल) ठरवू शकतो.
- टेक्निकल अॅनालिस्ट्सचा एक मुख्य फायदा हा आहे की एकदा का तुम्ही हे शिकलात की तुम्ही त्याचा वापर कोणत्याही असेट क्लास (शेअर्स, कमॉडीटी, करन्सी, इ.) मध्ये करू शकता. याउलट, फंडामेंटल अॅनालिसिसमध्ये शेअर्स घेण्यासाठी त्या कंपनीचा ताळेबंद, नफा-तोटा खाते उतारा, कॅशफ्लो स्टेटमेंट इ. गोष्टी अभ्यासाव्या लागतात तर सोन्याच्या खरेदीसाठी इतर बाजू तपासाव्या लागतात तर एखाद्या कृषीय वस्तूसाठी) वेगळ्याच प्रकारची माहिती वजा अभ्यास असणं गरजेचं ठरतं.
- बाजाराचा कल – तांत्रिक विश्लेषणाचा खास लाभ म्हणजे ट्रेडर्स व गुंतवणूकदारांना बाजाराचा अंदाज लावण्यास मदत होते आणि त्यानुसार आपले निर्णय घेण्यास मदत होते.
-प्रसाद ल. भावे, अर्थप्रहर