महावितरण कार्यालयाला निवेदन; आंदोलनाचा इशारा
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा व परळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मागील वर्षापासून खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येचा सामना करत आहेत, मात्र या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही, त्यामुळे ग्रामस्थ संतापले आहेत. या भागात सुरळीत वीजपुरवठा करावा; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या ग्रामस्थांनी महावितरणच्या जांभूळपाडा कार्यालयाला निवेदनाद्वारे दिला आहे.
महावितरणचा भार नियमन करण्याचा दिवस मंगळवार आहे, मात्र त्या दिवसाव्यतिरिक्तदेखील कित्येक तास वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. रात्री 1 च्या दरम्यान व पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सर्वात जास्त वेळा वीज जाते. त्यातच मागील चार महिन्यांपासून पथदिवे बंद आहेत. अशा परिस्थितीत जीवित व मालमत्तेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी मंगळवार सोडून इतर दिवशी वारंवार व दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
अॅड. प्रवीण कुंभार, महेश ठाकूर, केतन देसाई, मंगेश वाघमारे, बबन बाटेटिकर आदी ग्रामस्थांनी हे निवेदन महावितरणच्या जांभूळपाडा कार्यालयाला दिले आणि कार्यवाहीची मागणी केली.