14 ठिकाणी नदी पातळीमापक केंद्रांची उभारणी
अलिबाग : प्रतिनिधी
पावसाळ्यात महाड, पोलादपूर परिसराला पूर आणि भुस्खलन अशा आपत्तींना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाअंतर्गत महाड, पोलादपूर परिसरातील दरडप्रवण क्षेत्रात 26स्वयंचलित पर्जन्यमापक बसविण्यात आले आहेत. तर 14 ठिकाणी स्वयंचलित नदीपातळी मापक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
पावसाळ्यात महाड, पोलादपूर परिसराला पूर आणि भुस्खलन अशा आपत्तींना सामोरे जावे लागते. या परिसराचा भुवैज्ञानिकांकडून सर्वेक्षण करण्यात आला होता. यात दरडी कोसळण्यामागील प्रमुख कारण अतिवृष्टी असल्याची बाब समोर आली. एका अथवा लागोपाठच्या दिवसात 600 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला तर दरडींचा धोका संभावत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते. या पाश्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पाऊले उचलली आहेत.
महाड, पोलादपूर परिसरात नाविन्यपुर्ण योजनेअंतर्गत 26 ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास त्याची अचूक आणि तात्काळ माहिती जिल्हा प्रशासनाला मिळणार आहे. आणि अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर नद्यांची पाणीपातळी मोजण्यासाठी जलसंपदा विभागा मार्फत 14 ठिकाणी स्वयंचलित पाणीपातळी मापक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ज्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीची अचूक माहिती प्रशासनाला मिळणार आहे. पूर परिस्थिती व्यवस्थापनासाठी याची मदत होणार आहे.
महाड परिसराला दरवर्षी पूर समस्येला तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही पाऊले उचलली आहे. महाबळेश्वर, पोलादपूर परिसरात झालेल्या पावसाचा थेट परिणाम महाड परिसरावर होत असतो. सावित्री नदीची पातळी वाढते आणि महाड शहरालगत पूरस्थिती निर्माण होते. या उपाययोजनांमुळे पर्जन्य परिस्थिती आणि नदी पातळीचा अचूक अनुमान बांधणे प्रशासनाला शक्य होणार आहे.
2005 आणि 2021 या दोन वर्षातील महापूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनांचा अभ्यास करून, स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा आणि नदीपातळी मापक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाऊस आणि पूर परिस्थितीचे अचूक अनुमान मिळू शकेल. आणि प्रतिबंधात्मक आपत्ती व्यवस्थापन करणे सुकर होऊ शकेल.
-डॉ. पद्मश्री बैनाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड