खोपोली नगरपालिकेचा अभियंता नॉट रिचेबल
खोपोली : प्रतिनिधी
खोपोली नगरपालिका पाणीपुरवठा खात्याच्या गलथान कारभारामुळे लव्हेज ग्रामस्थांना पाणीटंचाई सामोरे जावे लागत आहे. या गावात शुक्रवारी पाणीपुरवठा झाला नाही, त्यामुळे गावातील संतप्त महिलांनी रस्त्यावर येऊन पालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात असंतोष व्यक्त केला. रायगड जिल्ह्यात श्रीमंत नगरपालिका म्हणून गवगवा असलेल्या खोपोली नगरपालिकेच्या पाणीपुरवठा खात्याच्या गलथान कारभारामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून गावात अपुरा व अशुध्द पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप लव्हेज ग्रामस्थांकडून होत आहे.विशेषतः महिला वर्गात असंतोषाचे वातावरण असून, त्याचा उद्रेक शुक्रवारी झाला. लव्हेज गावात शुक्रवारी पाणीपुरवठा झाला नाही, त्यामुळे गावातील संतप्त महिलांनी रस्त्यावर येऊन नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभारावर असंतोष व्यक्त केला.दरम्यान, नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अभियंता तेजस कराळे याला ग्रामस्थांसह त्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी आपला फोन बंद ठेवण्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महिलांचा संताप अनावर झाला होता. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख विनय शिपाई यांच्याशी ग्रामस्थांनी दूरध्वनीवरून संपर्क केला असता, त्यांनी पर्यायी व्यवस्था करणार असल्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले. मात्र उद्या शनिवारी पाणीपुरवठा झाला नाही तर, नगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असे लव्हेज गावातील महिलांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.