Breaking News

महाड एमआयडीसी रस्त्यावर खड्डे आणि नाल्यातील पाणी

वाहनचालक त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष

महाड : प्रतिनिधी

महाड एमआयडीसीमध्ये पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे नाटक केले जाते मात्र दरवर्षी नाल्यातील पाणी रस्त्यावर येवून साचत असल्याचे दिसून येत आहे. साफसफाई न झाल्याने गटारे तुंबून पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे गटारे आणि रस्ते एक होवून वाहनचालकांना पाण्यातून वाट काढणे कठीण होत आहे. तर अनेक ठिकाणी गटारातील पाणी रस्त्यावरून कंपन्यांच्या आवारात शिरत असल्याने कंपनी प्रशासनालादेखील डोकेदुखी झाली आहे.

प्रतिवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर महाड औद्योगिक क्षेत्रातील गटारे साफसफाईचा आणि रस्ता दुरुस्तीचा ठेका काढला जातो. मात्र ठेकेदाराकडून तात्पुरती डागडुजी केली जाते. पाऊस सुरु होताच गटार सफाई सोडून दिली जाते. गेली कित्येक वर्षे एकाच ठेकेदाराकडून ही कामे करून घेतली जात आहेत. यामुळे खड्डे भरताना पावसाचा मुहूर्त काढून सुरवात केली जाते आणि पाऊस सुरु होताच पावसाचे कारण देवून खड्डे भरणे आणि गटार सफाईचे काम सोडून देण्याचे काम केले जाते. गटारात गवत आणि माती तशीच पडून राहिल्याने यंदाच्या पावसाळ्यातही येथील गटारे तुंबली आहेत.  त्यामुळे गटारातील पाणी रस्त्यावर येत आहे.

महाड एमआयडीसीमधील गटार दुरुस्ती आणि देखभालीकरिता वार्षिक निविदा तत्वावर ठेका दिला जातो. मात्र यावर्षी या कामाच्या देखभालीकडे ठेकेदार आणि प्रशासनाने कानाडोळा केला. यामुळे गटारातील रसायनमिश्रित पाणी रस्त्यावर येत आहे. कारखान्यात ये-जा करणार्‍या कामगारांना त्यातून चालणे धोकादायक ठरत आहे.

महाड औद्योगिक वसाहतीमधील लासा, वसुंधरा, प्रीव्ही ऑरगॅनिक, आपटे ऑरगॅनिक, सिक्वेंट या कंपन्यांसमोरील रस्त्यावर पाण्याची तळी तयार होत आहेत. याठिकाणी असलेले गटारे अरुंद असल्याने आणि सफाई न झाल्याने कचर्‍याने भरली आहेत. गटारातील पाणी पुढे सरकत नसल्याने ते थेट रस्त्यावर येत आहे. इप्का केमिकलसमोर आणि शेजारील रस्त्यावरदेखील हीच अवस्था आहे. आसनपोई मार्गावर असलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिकसमोरदेखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सांडपाणी येत आहे. पावसाची संततधार किंवा मुसळधार पावसात पाण्याचा प्रवाह ओढ्याचे स्वरूप धारण करत असल्याने रस्त्यावर मोठे तलाव तयार होत आहेत. लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी सखल भागात असल्याने गटारातील पाणी थेट रस्त्यावर येवून कंपनीच्या मुख्य गेटमधून आत शिरत आहे. कंपनीच्या मुख्य दरवाजातच पाण्याचे तळे निर्माण झाले आहे. यातून कामगारांना ये-जा करणे कठीण झाले आहे.

नांगलवाडी ते आमशेत या प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पडले आहेत. औद्योगिक क्षेत्रात विविध भागातदेखील खड्डे पडले असून त्यात साचून राहणार्‍या पाण्यामुळे या खड्ड्यांचा विस्तार अधिकच वाढू लागला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply