Breaking News

पोलादपुरातील कवींद्र परमानंदांचे समाधीस्थळ उपेक्षित

पोलादपूर शहरातील शिवकालीन स्वामी कवींद्र परमानंद यांच्या समाधीस्थळी दरवर्षी मकरसंक्रांतीचा वार्षिकोत्सव आणि गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारण्याचा उपक्रम अखंडीतपणे सुरू आहे. मात्र, येथे गेल्या काही वर्षांपूर्वी सुशोभिकरणाचे काम रखडले. गेल्या चार पाच महिन्यांपासून या परिसराकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. समाधीस्थळी बांधण्यात आलेल्या मठामध्ये परमानंदांच्या जीवनाचा अल्पपरिचय देणारा लेखही भिंतींच्या रंगसफेदीदरम्यान दिसेनासा झाला आहे. स्थानिक कवी स्वामी परमानंद मित्र मंडळ या संस्थेबरोबरच संपूर्ण पोलादपूर शहरातदेखील याप्रकरणी नाराजी आहे. या परिसराच्या सुशोभिकरणाकडे त्वरीत लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

विधानपरिषद सदस्य अशोक मोडक यांच्या निधीतून तत्कालीन भाजपा तालुकाध्यक्ष मनोज भागवत यांच्या पाठपुराव्यातून 19 एप्रिल 1997 रोजी स्वामी कवींद्र परमानंद यांच्या समाधीस्थळी झालेल्या सुशोभिकरणाचा उद्घाटन सोहळा तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे, बांधकाममंत्री नितीन गडकरी, राज पुरोहित आणि आ. अशोक मोडक यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी याठिकाणी समाधीस्थळ आणि वाचनालयाची खोली यांचा समावेश होता. या वेळी परमानंदांच्या जीवनाचा अल्पपरिचय देणारा लेख भिंतीवर होता. यानंतर ग्रामपंचायतीकडून रायगड जिल्हा परिषदेमार्फत स्वामी परमानंद मित्र मंडळ या नोंदणीकृत संस्थेला दिवाबत्तीसाठी काही रक्कमेची तरतूद केली होती. याशिवाय, पोलादपूर ग्रामपंचायतीने काही रक्कम खर्ची घालून संरक्षण भिंत तसेच रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी सुशोभिकरणासाठी निधीची उपलब्धता केली. हे काम अपूर्ण असतानाच एका स्थानिक संस्थेमार्फत येथे दूर्गसृष्टी उभारण्याचे काम सुरू झाले. यानंतरही येथे निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र त्याची पूर्तता झाली नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी या समाधीस्थळाला भेट दिली आहे.

पोलादपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या कवींद्र परमानंद मठ परिसरात हिंदू मुस्लिम ऐक्याची प्रचिती संक्रांत आणि गुढीपाडवा मेळाव्यासह अनेक सार्वजनिक उत्सवप्रसंगी दिसून आली आहे. पोलादपूर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानंतर याठिकाणचे स्थानिक नगरसेवक संगिता इंगवले त्यानंतर सध्याचे स्थानिक नगरसेवक प्रसाद इंगवले व त्यांच्या आईंनी स्वामी कवींद्र परमानंद मठामधील उत्सव सुरू ठेवले. अलिकडेच, या समाधीस्थळाचे सुशोभिकरण करण्यासाठी नगरपंचायतीने खर्च केला असून महाबळेश्वर रस्त्यालगतच्या बाजारपेठ रस्त्याच्या प्रारंभी दहा पावलांवर या मठाच्या प्रवेशद्वाराची कमान उभारण्यात आली आहे.

ऐतिहासिक वास्तूला सध्या अत्याधुनिक कार्यालयासारखे स्वरूप आणून झालेले सुशोभिकरण जरी दृष्टीकोनातून खटकत असले तरी काही प्रमाणात सुशोभिकरण झाले असल्याचे समाधान वाटत आहे. यादरम्यान, स्थानिक कवी स्वामी परमानंद मित्र मंडळ या संस्थेकडून दरवर्षी मकरसंक्रांतीचा वार्षिकोत्सव आणि आनंदनगरकडून चैत्र प्रतिपदेला गुढी उभारण्याचा उपक्रम नियमित होत आहे. 2013 च्या गुढीपाडव्यावेळी नववर्षशोभा यात्रेचे आयोजन करून यात्रेचे विसर्जन याठिकाणी गुढी उभारून करण्यात आले होते. यावेळी सदर पदाधिकारी व त्यांचे कुटूंबिय या सोहळ्यात सामील झाले होते. ग्रामस्थांच्या काही शंकांना उत्तरे देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मिटींगमध्ये देणगीदारांच्या नावाचा फलक व देणगीची रक्कम तसेच कोणत्या निधीतून सुशोभिकरण व दृर्गसृष्टी साकार झाली याविषयांची चर्चा झाली. त्याविषयांवर नंतर पुढील कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे या मिटींगला उपस्थित राहिलेल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

स्वामी परमानंद शिवाजी महाराजांच्या दरबारातील एक राजकवी

कवी परमानंद स्वामींचे येथील समाधीस्थळ उपेक्षित असल्याने इतिहासप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. परमानंद हे शिवाजी महाराजांच्या दरबारी राजकवी होते. राजांनी त्यांना मठ गल्लीतील जागा भेट दिली होती. या परिसरात त्यांचा वाडा, एक बारव (विहीर) होती. समाधी मंदिरात समाधी शिळा असून, त्यावर शैव आणि इतर काही पुरावे आढळतात. येथे परमानंद हे अध्ययन आणि अध्यापनाचे कार्य करीत. 17व्या शतकातील शिवभारत तथा अनुवंश पुराण या काव्यरूपी ग्रंथाची निर्मिती त्यांनी केली. हा ग्रंथ माहितीचा खजिना ठरला आहे. यात आग्य्राहून सुटका, उंबर खिंडीची लढाई शिवाजीराजांनी स्वतः लढली त्याचे वर्णन, तसेच अफझलखानाचा वध इत्यादीची माहिती आहे. शिवचरित्रामध्ये परमानंद कवींना मोठे महत्त्व आहे.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply