Breaking News

कर्जत तालुक्याला पुराचा विळखा

उल्हास नदीवरील दहिवली, मालेगाव, पाषाणे पूल पाण्याखाली

कर्जत : बातमीदार

मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला आहे. बुधवार (दि. 13)सकाळपासून नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. नदीवरील दहिवली मालेगाव येथील पूल पाण्याखाली गेला आहे. तर पाषाणे पुलाला पाणी लागले आहे. दरम्यान, नदी काठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

कर्जत तालुक्यात आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी लागलेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यांत सरासरी 41 टक्के पाऊस झाला असून माथेरानमध्ये पाण्याची सरासरी दुप्पट आहे. हवामान खात्याने जाहीर केल्याप्रमाणे कर्जत तालुक्यात रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. लोणावळा, खंडाळा घाटात पडणारे पावसाचे पाणी उल्हास नदीच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात येत असते आणि त्यानंतर कर्जत तालुका जलमय होत असतो.तालुक्याच्या मध्यवर्ती भागातून वाहणारी उल्हास नदी बुधवारी सकाळपासून धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. या नदीवरील कर्जत शहरातील आमराई येथील पायपुलाला पाणी टेकले असून 44मीटर उंचीच्या बंधार्‍यावरून बुधवारी दुपारी पाणी वाहू लागले आहे.  त्याचा फटका कर्जत शहरातील बामचा मळा आणि नाना मास्तर नगरला बसला. नाना मास्तर नगरमधील मुख्य रस्ता जलमय झाला असून त्या भागात ओढ्याचे पाणी शिरले आहे. शहरातील इंदिरानगर भागातदेखील पाण्याचा वाढता प्रवाह धोका ठरू शकतो. तर उल्हास नदीकाठच्या बामचा मळा येथील घरांच्या पायर्‍यांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.

उल्हास नदीला आलेल्या महापुराच्या पाण्याचा सर्वाधिक धोका माथेरान-नेरळ-कळंब या रस्त्याला बसला असून या रस्त्यावरील दहिवली-मालेगाव येथील पूल सकाळीच पाण्याखाली गेला आहे. तर दुपारी या पुलावरून तब्बल चार फूट पाणी वाहून जात होते. तेथील पाण्याचा वेग लक्षात घेऊन मालेगावचे पोलीस पाटील प्रकाश पाटील यांनी पुलावरून कोणतेही वाहन जाऊ दिले नाही. याच रस्त्यावर धामोते येथील सखल भागातील रस्ता चार फूट पाण्याखाली गेला असून ही स्थिती रात्रीपासून कायम आहे. उल्हास नदीवरील रायगड जिल्हा हद्दीमधील शेवटचे गाव असलेल्या पाषाणे येथील पुलाला पाणी लागले आहे.

उल्हास नदीला आलेल्या महापुराचा फटका नदी काठच्या काही गावांना बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. उल्हास नदीच्या तीरावर कर्जत तालुक्यातील मालवाडी, बेंडसे, वावे, बार्डी, कोल्हारे, धामोते, हंबरपाडा, बिरदोले, शेलू या गावांना मोठा फटका बसत असतो. त्यामुळे त्या त्या ठिकाणी काय स्थिती आहे याची माहिती पोलीस आणि तालुका प्रशासन घेत आहे.प्रांत अधिकारी अजित नैराळे आणि तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडून पाहणी केली जात आहे.

नेरळ आणि भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात पाणी

मध्य रेल्वे मार्गावरील नेरळ स्थानकात पावसाचे पाणी शिरले आहे. नेरळ-माथेरान मिनीट्रेनच्या स्थानकात तसेच फलाटावरदेखील पाणी पोहचले असून प्रशासनाकडून तो रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. तर भिवपुरी रोड स्थानकात कर्जत बाजूकडील पाणी वाहून नेणार्‍या दोन मार्गिका पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे स्थानिक प्रवाशांना पाण्यातून वाट काढत रेल्वे स्थानकात जावे लागत आहे.

शाळा बंद, पुराच्या भीतीने आवराआवर

कर्जत ़: प्रतिनिधी

पावसाने कर्जत तालुक्यात थैमान घातले आहे. त्यातच पौर्णिमा असल्याने रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत होता. कर्जत शहर उल्हास नदीच्या काठावर असल्याने कधीही नदी उलटून पाणी शहरात येऊ शकते म्हणून शाळा व्यवस्थापनाने सोशल मीडियाद्वारे पालकांना शाळा बंद असल्याचे कळवले. त्यामुळे लहान मुले शाळेत आली नाहीत.

गेल्या वर्षी पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच कर्जत शहरात पाणीच पाणी होऊन नागरिकांचे खूप नुकसान झाले होते. त्या अनुभवावरून तळमजल्यावर राहणार्‍या अनेक नागरिकांनी घरातील सामानाची आवराआवर सुरू केली आहे. त्यातच लोणावळा जलाशयाची पातळी वाढत असल्याने उधील 24 तासात सांडव्यातून अनियंत्रित स्वरूपाचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. असे मेसेज सोशल मीडियावर येऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पुराच्या भीतीने कर्जतमधील कोतवाल नगर, विठ्ठल नगर, महसूल वसाहत आदी भागातील नागरिकांनी आपली वाहने मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळी सुरक्षित ठिकाणी उंच रस्त्यावर हलविली आहेत. काही जण नदी काठावर पाण्याचा अंदाज घेण्यासाठी फेर्‍या मारीत आहेत.

बुधवारी सकाळीच मालवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर पाणी उलटल्याने पलीकडे राहणार्‍या आदिवासींनी आपल्या कुटुंब कबिल्यासह स्थलांतर केले.  नगर परिषद व तहसीलदार विभागही सज्ज झाला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply