Breaking News

नवी मुंबईत विकासकामांसाठी खोदाई सुरूच

पावसात नागरिकांचा खड्ड्यांतून प्रवास

नवी मुंबई : बातमीदार

महापालिका आयुक्तांनी मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेताना शहरात सुरू असणारी सर्व खोदकामे 15 मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते, परंतु या आदेशाला पायदळी तुडवल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळा सुरू झाला तरी शहरात अनेक ठिकाणी महापालिकेची खोदकामे सुरूच असल्याने नवी मुंबईकर नागरिक मेटाकुटीला आले आहेत. अनेक कामांची मुदत संपली असताना देखील कंत्राटदाराकडून संथगतीने सुरू ठेऊन रेटा ओढला जात आहे. त्यामुळे ही विकासकामे आहेत की, खोदकामे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून 24 तास पाणी पुरवठ्यासाठी जलवाहिन्या टाकण्याचे काम ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हाती घेण्यात आल्याने ठाणे-बेलापूर मार्ग खोदून ठेवण्यात आला आहे. काही ठिकाणी पाईपलाईन टाकल्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या रस्त्यावर मातीचा भराव टाकून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गर्दीत दुचाकीने प्रवास करणार्‍या चालकांना खड्डेमय रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. तुर्भे नाका ते तुर्भे स्टोअर येथे उड्डाणपुलाच्या कामासाठी पावसाळ्यात पदपथ खोदण्याचे काम सुरू आहे. तर याच मार्गावर बेलापूरच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर महावितरणकडून केबल आणि पाइपलाइन टाकण्यासाठी खोदण्यात आले आहे. ऐरोली, कोपरखैरणे या ठिकाणी अंतर्गत रस्त्यावर मलनि:सारण वाहिन्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. या ठिकाणी खोदलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा विसर पालिकेला पडला आहे.

सानपाडा, तुर्भे, बेलापूर या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असून त्याच मार्गालगत पालिकेकडूनही खोदकाम करण्यात आल्याने दुहेरी त्रास वाहनचालक आणि सर्व सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. महापालिकेच्या माध्यमातून ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विविध कामे सुरू करण्यात आल्याने खोदकामाबरोबरच मातीचा थर रस्त्यावर पसरल्याने अपघाताची शक्यता आहे.

ठाणे-बेलापूर मार्ग, बोनकोडे-सानपाडा पामबीच मार्गावर मागील काही वर्षांपासून विनापरवाना गॅरेज दुकाने थाटली आहेत. या दुकानदारांनी एनएमएमटीचे बसथांबेदेखील गिळंकृत केले आहेत. वाहनांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणारे केमिकल हे रस्त्यावर साचलेल्या पावसाळ्याच्या पाण्यात मिश्रित होते. त्यामुळे या व्यावसायिकांवर ठाणे महापालिकेप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

शहरातील जोड रस्ते, उड्डाणपूल, मुख्य महामार्ग या ठिकाणी रस्त्याच्याकडेला मातीचे थर साचले आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने मुकुंद, साठेनगर, रबाळे नाका, तुर्भे नाका, शिरवणे उड्डाणपूल, सानपाडा उड्डाणपूल, नोसिल नाका, कोपरी गाव ते वाशी पामबीच जोड मार्ग, दिवाळे गाव सर्कल, आरटीओ रोड या ठिकाणी प्रवास करताना वाहनचालकांना वाहतूक कोंडी बरोबरच अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

नवी मुंबई परिसरात काही अतिमहत्त्वाची विकासकामे असतात. त्यांना विशेष परवानगी द्यावी लागते.

-संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई पालिका

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply