गेटवे-एलिफंटा, मोरा-भाऊचा धक्का, जेएनपीए प्रवासी लाँच सेवा ठप्प
उरण : प्रतिनिधी
विविध बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे गेटवे -एलिफंटा , गेटवे -जेएनपीए, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या मार्गावरील सागरी वाहतूक बंद करण्यात आली आहे. धोक्याच्या इशार्यानंतर या सागरी मार्गावरील प्रवासी, पर्यटक वाहतूक कोलमडली असल्याची माहिती बंदर अधिकार्यांकडून देण्यात आली आहे.
खराब हवामान आणि पावसाचा फटका येथील सागरी प्रवासी वाहतुकीलाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. त्यातच बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा काल संध्याकाळी लावण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून गेटवे ऑफ इंडिया-एलिफंटा दरम्यानची लाँचसेवा बंद करण्यात आली आहे. लाँचसेवा बंद करण्यात आल्याने पर्यटक वाहतूक ठप्प झाली असल्याचे घारापुरी बंदर विभागाचे अधिकारी विनायक करंजे यांनी दिली. गेटवे ऑफ इंडिया येथुन जेएनपीए बंदराकडे प्रवाशांना घेऊन जाणारी सागरी सेवाही मंगळवारी सायंकाळपासून बंद करण्यात आली आहे.
भाऊचा धक्का ते मोरा या सागरी मार्गावरूनही प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक कालपासूनच कोळमडली असल्याची माहिती मोरा बंदर विभागाचे अधिकारी प्रकाश कांदळकर यांनी दिली आहे.
करंजा- रेवस दरम्यानची तरसेवाही कालपासूनच बंद करण्यात आली आहे. वादळी, खराब हवामानामुळे स्थानिक मासेमारीवरही विपरीत परिणाम झाला आहे. धोक्याच्या इशार्यानंतर स्थानिक मासळी बाजारात मासळी मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे मासळी खवय्यांचे हाल झाले आहेत.
विविध सागरी मार्गावरील पर्यटक, प्रवासी सेवा खंडित झाल्याने या सागरी मार्गावरुन दररोज प्रवास करणार्या हजारो प्रवासी, पर्यटकांची गैरसोय झाली आहे.