माणगाव : प्रतिनिधी
नवरात्र उत्सवात सर्वत्र नृत्य, गाणी व विविध पारंपरिक संस्कृतीचा जागर होत असताना उतेखोल (ता. माणगात) गावातील प्राथमिक शाळेचे विद्यार्थी माणगावातील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयात वाचन उपक्रमात रमले आहेत. ज्ञानरचनावादी शिक्षण देणार्या या शाळेत विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत विकसित होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, विविध पुस्तकांची ओळख व्हावी, यासाठी उतेखोल शाळेच्या विद्यार्थ्यांना नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून वाचन जागर उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सायली आंबूर्ले व शिक्षिका अस्मिता खडतर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमात उतेखोल शाळेच्या विद्यार्थ्यांनी माणगावच्या ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय जाऊन विविध पुस्तके, वृत्तपत्रे यांची माहिती करून घेतली. ग्रंथालय प्रमुख नम्रता जाधव यांनी विविध गोष्टींची पुस्तके, चरित्रे, वृत्तपत्रे यांची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. उतेखोल शाळेच्या या वाचन जागर उपक्रमाचे शिक्षण, वाचनप्रेमी व पालक यांनी कौतुक केले आहे.
विद्यार्थ्यांनी बालवयातच पुस्तके वाचायला सुरुवात केल्यास वाचन संस्कृती अधिक वृद्धिंगत होईल. त्यामुळे परिसरातील शाळांनी वाचन जागर उपक्रमात सहभागी होऊन ग्रंथालयाची सहल व वाचन उपक्रम राबवावा.
-नम्रता जाधव, ग्रंथालय प्रमुख, ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय-माणगाव.