एकंदर राजकारणाच्या पटलावर नजर टाकली की शिवसेनेचे अध:पतन ठळकपणे दिसून येते. अर्थात, येथे शिवसेना या शब्दाचा अर्थ उद्धव ठाकरे समर्थकांचा गट असा घ्यायचा. पक्ष प्रमुखपदी ठाकरे यांचे नाव अजुनही कायम असले तरी पक्षनेतृत्वाचा अक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच निर्देश करताना दिसतो. शिवसेना नेमकी कुणाची या प्रश्नाचे उत्तर बुधवारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या वेळी मिळेल असे ठाकरे समर्थकांकडून सांगितले जात असले तरी महाराष्ट्राच्या जनतेला मात्र याचे उत्तर कधीच मिळाले आहे. गेल्या महिन्यात गुवाहाटी येथून घडलेल्या सत्तांतराच्या नाट्याच्या वेळी तीन डझन आमदार आणि डझनभर अपक्ष यांचे पाठबळ शिंदे यांच्या मागे उभे राहिले होते. आता गावोगावच्या कार्यकर्त्यांचे लोंढे ‘शिंदेसेने’त सामील होताना दिसत आहेत. ठिकठिकाणच्या नगरपरिषदा आणि नगरपालिका तूर्त बरखास्त असल्याने नगरसेवकांची मोजदाद करणे तांत्रिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही. परंतु शेकडो माजी नगरसेवक शिंदेसमर्थकांच्या छावणीत एव्हाना सामील झाले आहेत. पक्षातील ही प्रचंड फूट कशी रोखावी याचा उपाय अजुनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सापडलेला नाही. समेटाच्या दृष्टीने काही हालचाली करण्याऐवजी ठाकरे समर्थकांचे कोंडाळे आपले नकारात्मक राजकारण सुरूच ठेवण्याच्या मन:स्थितीत आहे. पक्षनेतृत्वाच्या या मानसिकतेमुळेच एका मजबूत पक्षाचे विघटन होताना दिसते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे समर्थकांच्या गटाला सोमवारी आणखी एक निर्णायक हादरा दिला. लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली जाणार असून प्रतोदपदी भावना गवळी कायम राहणार आहेत असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. शिंदे यांनी स्वत:ची मुख्य नेतेपदी नेमणूक जाहीर केली. पक्षप्रमुख पदाला मात्र त्यांनी कुठलाही धक्का न लावता पक्षाची सूत्रे आपल्याच हाती आहेत हे दाखवून दिले आहे. मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्याकरिता मात्र हा वर्मावर घाला मानला जातो. शिवसेनेचे 14 ते 15 खासदार शिंदे यांच्या गोटात सामील होत असल्याच्या बातम्या गेले अनेक दिवस येत आहेत. राष्ट्रपतीपदाची निवडणूक संसदीय पक्षातील फुटीला कारणीभूत ठरेल असे बोलले जात होते. परंतु एकंदरीत परिस्थिती पाहून ठाकरे यांनी माघार घेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. भाजपप्रणित उमेदवाराला पाठिंबा देणे ठाकरे समर्थकांना भागच पडले. अन्यथा तेथेच पक्षाची झालेली वाताहत जगजाहीर झाली असती. महाविकास आघाडीत राहून भाजपप्रणित उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या भूमिकेचे समर्थन केले गेले हे खरे. परंतु पाठोपाठ येणार्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला विरोधकांनी पुरस्कृत केलेल्या उमेदवार श्रीमती मार्गारेट अल्वा यांना शिवसेनेचा पाठिंबा मिळाला आहे. अर्थात हा पाठिंबा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. त्यांचे खासदार आदेशानुसार अल्वा यांनाच मतदान करतील अशी शक्यता दिसत नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील बदलाच्या घटनाक्रमामधून एकमेव गोष्ट ठळक होताना दिसते, ती म्हणजे शिवसेनेचे विघटन. शिवसेना तशीच्या तशी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठिशी उभी राहील आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही मोजकेच शिलेदार शिल्लक उरतील हे भविष्यातील चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. एवढ्या महाप्रचंड संकटातून पक्षाचे गलबत कसे वाचवायचे हा एकमेव जीवन-मरणाचा प्रश्न शिवसेनेच्या पक्षनेतृत्वाला सोडवावा लागणार आहे.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …