Breaking News

धोकादायक दरडींवर उपाययोजना आवश्यक

वरंध भोर आणि महाबळेश्वर या दोन्ही घाट मार्गात सातत्याने दरडी कोसळत असल्याने या दोन्ही घाटातील वाहतूक मंदावली आहे. त्यातच प्रशासनाने अवजड वाहतूक बंद केली आहे. भितीपोटी लहान वाहनचालकांनी या घाटाकडे पाठ फिरवली आहे. महाडकरांच्या यातना काही संपता संपत नाहीत तर यामुळे या मार्गावरील पावसाळी पर्यटनालादेखील फटका बसला आहे. मात्र पर्यटकांनाही प्रशासनाला तेवढीच साथ दिली पाहिजे. दरम्यान, पर्यटन व वाहतुकीवर अवलंबून असलेले घाटातील स्थानिक विक्रेते मात्र हवालदिल झाले आहेत. म्हाप्रळ पंढरपूर या महामार्गावर महाड तालुक्यातील वरंधपासून भोरपर्यंत घाटमार्ग आहे. संपूर्ण कोकणला पुण्याला जोडणारा हा सर्वात जवळचा मार्ग आहे. महाडसह एमआयडीसीची वाहतूक याच घाटातून मोठ्या प्रमाणात होत असते. या घाटात महाड आणि पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सीमेवर वाघजाई मंदिर आणि त्यापुढे असणार्‍या गावातील ग्रामस्थ रस्त्यावर हॉटेल, टपर्‍या, तसेच मका विक्री करून उदरनिर्वाह करतात. वरंध आणि महाबळेश्वर या दोन्ही घाटात ऐन पावसाळ्यात दाट धुके, कोसळणारे धबधबे, हिरवीगार झाडी पाहण्यासाठी पुणे, मुंबईसह रायगडमधील पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गर्दी करतात. मात्र गेले काही वर्षांपासून या पावसाळ्यात वरंध घाटात सातत्याने दरडी कोसळून घाट वाहतुकीस धोकादायक बनू लागला आहे. घाटातील अवघड स्थिती पाहता प्रशासनाने घाटातील वाहतूक बंद केली आहे. अवजड वाहतुकीस घाट बंद केला असला तरी लहान वाहनेदेखील घाटातून प्रवास करणे टाळत आहेत. यामुळे घाटात शुकशुकाट पसरला आहे. पावसाळ्यात कायम गजबजला जाणारा घाट सुनसान पडल्याने छोटे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. महाड वरंध घाटात महाड आणि भोर सीमेवर वाघजाई मंदिर आहे. याठिकाणी स्थानिक ग्रामस्थ भजी आणि चहाचा व्यवसाय करतात. महाडपासून थेट पुणे, मुंबईमधील पर्यटक घाटात पावसाळ्यात धबधब्यावर भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येतात. वरंध आणि महाबळेश्वर या दोन्ही घाटात पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मात्र जुलै 2021मधील अतिवृष्टीत घाटातील झालेली दुर्दशा अद्याप सुधारलेली नाही. घाटात होत असलेले भूस्खलन आणि तीव्र उतारातून येणार्‍या दगडी यामुळे याठिकाणी पावसाळी आनंद घेणे जीवावर बेतू शकते. यामुळे प्रशासनानेदेखील वाहतुकीस बंदी केली आहे. महाबळेश्वर घाटात ठिकठिकाणी स्थानिक व्यावसायिकांनी हॉटेल सुरु केले आहेत. या मार्गावर वाडा गावातील ग्रामस्थ तर गेले अनेक वर्षे विविध व्यवसाय करत आहेत. महाबळेश्वर मार्गावरदेखील लघु व्यावसायिक आणि विक्रेते पावसाच्या मोसमात पर्यटकांची वाट पाहत बसले आहेत. शालेय विद्यार्थ्यांचेदेखील हाल होत आहेत. वरंध घाटात एक छोटी दरड आल्यानंतर प्रशासनाने अवजड वाहतूक बंद केली. यामुळे अवजड आणि लहान वाहनांचीदेखील या मार्गावरून वर्दळ थांबली. एस.टी. प्रवासदेखील बंद झाल्याने भोर महाड सीमेवरील गावांमधील शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी वरंध गावात येतात. या विद्यार्थ्यांना देखील आता एखादी खासगी वाहन व्यवस्था करून शाळेत यावे लागत आहे. पाऊस असल्यास वाहने येत नाहीत अशावेळी विद्यार्थ्यांची शाळा बुडत असल्याने शैक्षणिक नुकसानदेखील होत आहे. रस्ता उत्तम असला तरी केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. यामुळे प्रशासनाने या मार्गावरील अवजड वाहनांचा प्रवास थांबवला आहे. पावसाळ्यात येणार्‍या पर्यटकांनी पाठ फिरवल्याने या मार्गावरील विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे घाटातील हॉटेल व्यावसायिक बोलत आहेत. दरम्यान अतिउत्साही पर्यटकांमुळे काही निर्णय प्रशासनाला घेणे भाग पडते हेही तेवढेच खरे आहे.

-महेश शिंदे

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply