नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताच्या अश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी जोडीने इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अठराव्या स्थानावर असणार्या ली वेनमेई-झेग यू या जोडीला पराभवाचा धक्का देऊन सनसनाटी सलामी दिली. महिला दुहेरीच्या सलामीच्या लढतीत राष्ट्रकुल पदकविजेत्या अश्विनी-सिक्की रेड्डी जोडीने ली-यू जोडीवर 22-20, 21-19 अशी मात केली.
जागतिक क्रमवारीत 23व्या क्रमांकावर असलेल्या अश्विनी-सिक्की रेड्डी जोडीने सईद मोदी स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले आहे. त्यामुळे सध्या ही जोडी फॉर्मात आहे. अश्विनी म्हणाली, गेल्या आठवड्यात आम्हाला चांगला सराव मिळाला. आम्ही काही अव्वल खेळाडूंना चांगली लढत दिली होती, मात्र आमची झुंज अपयशी ठरली. अर्थात यामुळे आमचा आत्मविश्वास निश्चित उंचावला.
दरम्यान, पात्रता फेरीत भारताच्या 18 खेळाडूंनी मुख्य फेरीत प्रवेश मिळवला. यात आठ एकेरीचे खेळाडू असून, दुहेरीच्या 10 जोड्या आहेत. यात एकेरीत राहुल यादव, सिद्धार्थ ठाकूर, कार्तिक जिंदाल, कार्तिकेय गुलशनकुमार यांचा समावेश आहे.