Breaking News

रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले

विविध भागांत पूरसदृश्य स्थिती, जनजीवन विस्कळीत

अलिबाग : प्रतिनिधी

रायगडला बुधवारी (दि. 13) पावसाने पुन्हा झोडपले.   रायगडच्या मध्यभागात पावसाचा जोर होता. जिल्ह्याच्या काही भागात दिवसभर पावसाची संततधार सुरू आहे. कर्जत, खालापूर, पाली, नागोठणे, रोहा भागात दिवसभर जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. नागोठणे येथे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातील एकूणच जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळपासून कोसळणार्‍या पावसामुळे खोपोली शहरातील सखल भागात पावसाचे पाणी शिरले आहे. यामुळे छोटे-मोठे नाले ओसंडून वाहत आहेत. नद्यांच्या पाणी पातळीतदेखील वाढ होत आहे.  कर्जत जवळच्या दहीवली येथील उल्हास नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने तेथील वाहतूक थांबविण्यात आली आहे. शेलू भागातील 305 कुटुंबातील 703 जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पाताळगंगा, कुंडलिका आणि अंबा या तीनही प्रमुख नद्या इशारा पातळीच्या वरून वहात आहेत. अंंबा नदीवरील पालीजवळच्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे या पूलावरून होणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे. खोपोली ते वाकण दरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.  मंगळवारी आणि बुधवारी सलग दोन दिवस हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचे अधिकार संबंधित तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. कर्जत, खालापूर तालुक्याबरोबरच महाडमधील शाळादेखील सोडण्यात आल्या. महाड व माणगाव तालुक्यात देखील जोरदार पाऊस होत असला तरी अद्याप कुठेही धोकादायक स्थिती निर्माण झाल्याचे वृत्त नाही. सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात मध्य भागात पावसाचा जोर असला तरी किनारपट्टीच्या भागात पाऊस खूपच कमी आहे. अलिबाग, मुरूड, उरण आणि श्रीवर्धन तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू असून अधूनमधून मोठी सर येत आहे. बुधवारी सकाळी संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 71.01 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कर्जत तालुक्यातील माथेरान येथे सर्वाधिक 217 मिलीमीटर पाऊस झाला तर सर्वात कमी नोंद मुरूड तालुक्यात झाली असून तेथे अवघा 5 मि. मी.पाऊस झाला आहे.

म्हसळा तालुक्यात मुसळधार पाऊस

म्हसळा : म्हसळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. चालू पावसाळी हंगामात आजपर्यंत 1238 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात एक जुलैपासून धुवाँधार पाऊस पडत आहे. गेल्या तेरा दिवसात 755 मि.मी. पावसाची नोंद झाली. बुधवारी दुपारी 11 ते 12 च्या दरम्यान सोसाट्याच्या वार्‍याने नागरीकांनी गेल्या निसर्ग वादळाच्या आठवणींना उजाळा दिला. तालुक्यात नैसर्गिक आपत्ती नुकसानीचा आजपर्यंत 12 घटनांची नोंद झाल्याचे निवासी नायब तहसीलदार जी. एम. तेलंगे यांनी सांगितले.  तालुक्यातील पाभरे, संदेरी ही दोनही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होवू लागला आहे. आपत्ती काळात तालुक्यांतील झालेले नुकसान पुढीलप्रमाणे-पूर्णत: पडलेली कच्चे घर एक (आडी महाड खाडी), अंशत: पडलेली पक्की घरे चार (आंबेत दोन, पाष्टी एक, म्हसळा आदिवासीवाडी एक), स्वच्छतागृहाचे नुकसान तीन (मेंदडी, सुरई, वारळ), विहीर कोसळणे एक (फळसप), घरा भोवतालची भिंत कोसळणे दोन (आंबेत, वारळ) पशुधन हानी (मोठी जनावरे)दोन (आंबेत शॉक लागून, संदेरी पुरांत वाहून) या कालावधींत कोणत्याही झोपड्यांची, गोठ्यांची पडझड झाली नाही. जीवितहानी व जखमी व्यक्ती अहवाल निरंक, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान निरंक. दरम्यान, म्हसळा तालुक्यात आपत्ती नियंत्रण कक्ष (तहसील कार्यालय) येथे 24 तास सुरु आहे. काही आपत्ती झाल्यास कृपया पुढील क्रमांकावर 02149-232224, मोबाइल 8459795326 येथे संपर्क साधावा असे आवाहन निवासी नायब तहसीलदार जी. एम. तेलंगे यांनी केले आहे.

रोहा तालुक्यात पावसाचा जोर कायम

रोहा : तालुक्यात बुधवारी (दि.13) सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. कुंडलिका नदीने रौद्ररूप धारण केले आहे. या नदीचे पाणी पुलाला लागल्याने रोहा अष्टमी जुना  पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून नगर परिषदेच्या वतीने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सायरन वाजवून नागरिकांना सावधान करण्यात आले. रोहा तालुक्यात आठवडाभर पावसाने मुक्काम ठोकला असून बुधवारी मुसळधार पावसाने झोड उठविली. त्यामुळे तालुक्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. कुंडलिका नदी तुडुंब भरून वाहत आहे. खबरदारी म्हणून या नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूस नगर परिषद कर्मचारी व वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. नगर परिषदेच्या वतीने रोहा अष्टमी शहरातून रिक्षा फिरवुन नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत होते. गेले तीन चार दिवस कुंडलिका नदीकाठच्या शेतात पाणी साचून आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply