Breaking News

चौलच्या रामेश्वर पुष्करणीत पाणकावळ्यांची सैर

रेवदंडा ः प्रतिनिधी
पावसाळ्यात तुडूंब भरलेल्या चौल येथील रामेश्वर पुष्करणीत दुर्मीळ पाणकावळ्यांचे आगमन झाले आहे. त्यांचे पोहणे, मासेमारीसाठी पाण्यात खोलवर डुबकी मारणे आनंददायी चित्र आहे. चौल रामेश्वर पुष्करणीत गेले काही दिवस तीन पाणकावळे सैर करताना दिसून येत आहेत. चकचकीत काळसर वर्णाचा, काळ्या पिसावर हिरवट निळसर झाक, निमुळती, चपटी व टोकाशी किंचित बाकदार पिवळसर काळी चोच, लांबलचंक सडपातळ मान, गळ्यावर पाढुरंका ठिपका, लांब व कडक शेपटी लक्ष वेधून घेते. कावळ्यासारखा दिसतो म्हणून त्याला पाणकावळा म्हटले जाते. त्यास कारा, कोकोक, करढोल, कामरा अशा विविध नावांनीही ओळखले जाते. पाणकावळा हा भारतात सरोवरे, नद्या, नाले, पाणथळी, खांड्याच्या प्रदेशात एकटा अथवा थव्याने आढळतो. मासेमारी करणारा पक्षी म्हणून पाणकावळा ओळखला जातो. सध्या चौल येथील रामेश्वर पुष्पकरणीत स्थानिकांनी मासे सोडल्याने मासेमारी करण्यासाठी तीन पाणकावळे हजर झाले आहेत. पुष्करणीत ज्या वेळी रेलचेल नसते, शुकशुकाट असतो त्या वेळी हे पाणकावळे पाण्यात डुबकी मारून मासे पकडतात. पुष्करणीत दिसणारे हे पाणकावळे नजीकच्य नारळाच्या झाडाच्या झापावर सुपासारखे पंख पसरवून ते सुकवितात. तेलग्रंथींच्या अभावाने त्यांना थोड्या थोड्या वेळाने पंख सुकविण्यासाठी पाण्याबाहेर यावे लागते. पंखातील पाण्याचा भार हलका झाल्यावर मस्त हवेत झोकून देऊन पाण्याला समांतर हातभर उडताना पहाताना आगळीकता वाटते. भक्ष्य हेरताच तो त्यांची लवचिक, लांब मान ताणून पाण्यात डुबकी मारतात. माशाचा पाठलाग करून त्यास पाण्याखाली चोचीत आडवा पकडतात. त्यानंतर तेथेच त्याला न खाता पाण्याबाहेर येऊन गिळतात. हा पाणकावळा एक कुशल पाणबुड्या म्हणून पक्षी जगतात ओळखला जातो.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply