25 व 26 जुलै 2005 रोजी पोलादपूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीने हाहाकार माजविला. उत्तरवाहिनी सावित्री, चोळई, कामथी, घोडवनी आणि ढवळी नद्यांची पात्र तुडूंब भरून वाहताना काठावरील शेतजमीन अन् भाताची रोपेही सोबत वाहून नेत होती. महाड तालुक्यातील जुई, कोंडीवते, दासगांव, रोहन गावांत धरणीमातेच्या उदरात अनेक मानवी देह गाडले गेले तोच प्रकार पोलादपूर तालुक्यातील कोतवाल खुर्द, कोतवाल बुद्रुक आणि लोहारे पवारवाडीमध्येही झाला. गाडले गेलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी तसेच कशेडी घाटातील दरड हटविण्यासाठी कोणतीही तातडीची उपाययोजना होऊ शकल्याने पोलादपूरचे जनजीवन तब्बल 11 दिवस ठप्प राहिले.
पोलादपूरचे वाचनालय, गंगामाता सभागृह, सुंदरराव मोरे महाविद्यालय वाहून गेले. जुना महाबळेश्वर रस्ता खचला. सरकारी गोदामातील शेकडो टन धान्य भिजले. गेल्या 100 वर्षांत असा पूर कधी कोणी पाहिला नव्हता, असे त्यावेळी 82 वर्षांचे असलेले राम गुरूजी यांनी सांगितले. चित्रेंच्या घाटावरील तीन छोटी मंदिरेही फूटून वाहून गेली. कोतवाल बुद्रुकमध्ये सारं कुटूंबच गाडले गेले. पैठणचा पूल वाहून गेला. कोतवाल खुर्दमध्येही तीन जण गाडली गेली. घरांना तडे गेले. मोठमोठे दगड चेंडूसारखे टप्पे घेत काही घरांच्या कौलांतून पोटमाळ्यांवर येऊन थांबले. चरईच्या पुलाजवळ उत्तरवाहिनी सावित्रीचे पात्र दिशा बदलून परतले. बंडू चित्रेची चाळ वाहून गेली. बोरावळे येथे डोंगराला भेगा पडल्या.
तुटवलीत डोंगर खचला अन् पूलही वाहून गेला. लोहारे पवारवाडीत जमीन दुभंगली अन् घर दुभंगून दोघे गाडले गेले. दिविलचा केटी बंधारा फुटला. कशेडी घाटामध्ये डोंगर आमराईसह मुंबई-गोवा महामार्गावर उतरला अन् घाट बंद झाला. वीजपुरवठा तीन दिवस ठप्प कारण अनेक वीजेचे खांब वाहून गेले अन् काही कोसळले. कोंढवी भागामध्येही जमिनीला तडे गेले. कोतवाल खुर्दच्या एका घराच्या पोटमाळ्यावर आजही एक मोठी दरड स्थिरावलेली आहे.
अनेक गावांतील पाणीयोजना, रस्ते, झाडे, साकव, पूल, बंधारे, संरक्षक भिंती, स्मशानशेडया अस्मानी संकटांने गिळल्या. लेप्रसी हॉस्पिटलसमोरील ब्रिटीशकालीन पूलही दुभंगण्याचा धोका निर्माण झाला. 25 आणि 26 जुलै 2005 न विसरता येणार्या घटनाक्रमांचा काळ तब्बल दहा जणांचे बळी घेणारा ठरला. अनेकांचे संसार उघड्यावर आणले. आता सर्व आठवणी मनात घर करून आहेत, पण धास्ती कायमच आहे. कोतवाल खुर्द व कोंढवीसह अनेक गावांमध्ये दरडग्रस्तांना घरकुले देण्याची पूर्ण सज्जता झाली. आधार संस्था असो वा सिद्धीविनायक अनेकांनी यासाठी पुढाकार घेतला. स्वत:चे घर मिळण्यास विलंब झाल्याने काही पुन्हा दरडग्रस्त घरामध्ये राहू लागलेत. भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या सरकारी अहवालामध्ये सर्व सत्य मांडलेय. आपत्ती निवारण कायदा 2007 निर्माण झाला, पण सरकारी अधिकार्यांना त्याची धास्ती दिसत नाही.
25 व 26 जुलै 2005 रोजी अतिवृष्टी, महापूर आणि भूस्खलनाच्या अस्मानी संकटानंतर महाड आणि पोलादपूर तालुक्यातील आपद्ग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था पुढे सरसावल्या. पोलादपूरमध्ये दरडग्रस्तांच्या एका घराचे दोनपेक्षा अधिक अॅसेसमेंटचे उतारे देण्यात आले. त्यानुसार कॅशडोलचे वाटप करून प्रत्यक्षात घरावर दरड कोसळूनही रेशनकार्ड अथवा मतदारयादीमध्ये नाव नसलेल्या मुंबई व सुरत येथील चाकरमान्यांना ना कॅशडोल ना घरकूल अशा परिस्थितीत अद्याप दुर्लक्षित ठेवण्यात आले आहे.
पोलादपूरच्या दरडग्रस्तांचे पुनर्वसन जेथे होत आहे ती घरकुले मोडकळीस आलेली आणि कोणत्याही नागरी सुविधेचा अभाव असलेली होती. यातच दरडग्रस्तांची यादी नियमबाह्य झाल्याने घरकुलांच्या संख्येचा ताळमेळ दिसून येत नाही. कॅशडोलची मदत ज्यांनी उगीचच लाटली आहे, अशा सर्वांना जर आपद्ग्रस्त मानले तर त्यांना घरकुले देण्याची आवश्यकता आहे. तसे नसल्यास कॅशडोलची रक्कम व्याजासह परत घेऊन सरकारी तिजोरीत जमा करण्याची कारवाई होण्याची आवश्यकता आहे.
पोलादपूर तालुक्यातील पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यात बोरावळे येथील नऊ घरांच्या बांधकामानंतर तेथील दरडग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण झाले. सावित्री महिला विकास संस्थेतर्फे पैठण गावात तीन, देवपूर येथे चार, पार्ले येथे तीन, माटवण येथे पाच, पोलादपूर- जोगेश्वरी गाडीतळ येथे तीन, सडवली येथे सहा, लोहारमाळ येथे चार, रानबाजिरे येथे 23, आड येथे दोन, सवाद येथे एक आणि हावरे येथे सहा अशी एकूण 61 घरकुले बांधण्यात येऊन ताबाही देण्यात आला. पोलादपूर येथील चित्रे यांना घरबांधणीसाठी सरकारी अनुदान देण्यात आले.
कोंढवी येथे 78 कुटूंबे दरडग्रस्त असताना याठिकाणी प्रत्येकी 50 लाख रूपये खर्चातून केवळ 15 घरकुले उभारण्यात आली. कोंढवीमध्ये केवळ 29 पात्र दरडग्रस्त असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. कोंढवी येथे तांत्रिक मान्यता किंमत 49 लाख 49 हजार 651 रूपये एवढी असून दरसूचीमध्ये झालेल्या वाढीमुळे निविदेची किंमत 23.50 टक्के अधिक वाढल्यामुळे कोंढवीतील एका घरकुलासाठी तीन लाख 20 हजार 875 रूपये 95 पैसे खर्च झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून तब्बल एक कोटी रूपयांच्या निधीमधून बांधण्यात आलेली ही घरकुले तालुक्यात राजीव गांधी निवारा योजना क्र.2 च्या एक लाख रूपये कर्जातील घरकुलांपेक्षा लहान आणि निकृष्ट स्वरूपाची आहेत.
तत्कालीन जिल्हाधिकारी सुभाष सोनवणे यांनी सिद्धीविनायक ट्रस्टकडून दुसर्या टप्प्यातील 50 लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला, मात्र त्यानंतर कोंढवी येथील घरकुलांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याऐवजी ती दिवसेंदिवस खालावत गेली. येथे वीज, पाणी, रस्ते, शाळा अशा मूलभूत सुविधांचा पुनर्वसन कार्यक्रमामध्ये समावेश असूनही त्याबाबत कार्यवाही झाली नाही. दुसर्या टप्प्यात मिळालेली रक्कम झालेल्या कामापोटीच मिळाली, असे सांगून ठेकेदार त्याठिकाणी फिरकेनासेही झाले.
कोंढवी येथील घरकुलांच्या वाटपाची सोडत काढण्यासाठी 25 फेबु्रवारी 2011 रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये वाटप झालेल्या 15 दरडग्रस्तांपैकी एकमेव येथे वास्तव्यास जात असून त्याने 29 पात्र दरडग्रस्तांच्या यादीमध्ये बोगस दरडग्रस्तांचा समावेश असल्याचे माहितीच्या अधिकारात केलेल्या पाठपुराव्यामध्ये उघड केले आहे.
कोंढवी येथे दरडग्रस्तांच्या घरकूल बांधकामाच्या शुभारंभाची कोनशिला फोडून शुभारंभाच्या सोहळयाला विरोध करण्यात आला. यानंतर संबंधित जागेबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. घरकुलांचे वाटप करण्यासाठी तत्कालीन तहसीलदार गणेश सांगळे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असूनही दरडग्रस्त लाभार्थी ताबा घेण्यास तसेच वास्तव्यास आलेले दिसून येत नाही. परिणामी, या सर्व 15 घरकुलांची दुरवस्था होऊन दिवसेंदिवस घरकुले ढासळू लागली आहेत. कोतवाल खुर्द येथे 10 डिसेंबर 2007 रोजी तांत्रिक मान्यता किंमत 49 लाख 21 हजार 434 रूपये असून दरसूचीमध्ये झालेल्या वाढीमुळे निविदेची किंमत 23.50 टक्के अधिक वाढल्यामुळे 10 लाख 64 हजार 81 रुपये खर्चातील अधिक वाढ होणार आहे. त्यानुसार कोतवाल खुर्द येथील एका घरकुलासाठी तीन लाख 45 हजार 790 रूपये 75 पैसे खर्च झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झाली आहे.
कोंढवीप्रमाणेच कोतवाल खुर्द येथे देखील या घरकुलांच्या कामाच्या भूमिपूजनावेळी स्थानिक दरडग्रस्त व जागामालकांचा विरोध असल्याने ही नाराजी एका महिलेने शुभारंभासाठी आलेले तत्कालीन आमदार माणिकराव जगताप यांच्याकडे व्यक्त केली मात्र प्रशासनाने कानावर हात ठेवले, ठेकेदाराने काम साधले, राजकारण्यांचे राजकारणही झाले आणि विरोधकांचा विरोधही यशस्वी झाला असला तरी अद्याप दरडग्रस्त घरकुलांपासून वंचितच राहिले आहेत.
-शैलेश पालकर, खबरबात